Social Icons

Pages

Monday, November 21, 2016

चमचमत्या लाटा

नेमक कधी आठवत नाही. मी तिसरी चौथीत असेन कदाचीत. आम्ही गणपती पुळ्याला गेलो होतो. रात्री जेवणं उरकल्यावर सहज समुद्रावर फेरफटका मारायला बाहेर पडलो. त्याकाळी आठ-साडेआठ वाजले की समुद्रकिनारे ओस पडत असतं. आत्ता सारखं बीच साईड कॅम्पिंग वगैरेच फॅड तेव्हा नव्हतं. स्ट्रीट लाईट वगैरेचे चोरटे प्रकाशझोत तर सोडाच पण आकाशात चंद्राचाही पत्ता नसल्याने संपूर्ण किनाऱ्यावर काळ्या मिट्ट अंधारच साम्राज्य पसरलं होत. अंधारात अंदाजे चाचपडत आम्ही मंदिराच्या शिजराच्या गल्लीतून समुद्र किनाऱ्यावर दाखल झालो. निर्मनुष्य किनाऱ्यावर मात्र निसर्गाने एक वेगळाच खेळ मांडला होता. समोर जे दिसतंय ते नेमकं काय हे समजत नव्हतं. किनाऱ्याकडे झेपावणारी प्रत्येक लाट उलटताना रेडियम सारखी झगमगत होती. त्या काळ्या कुट्ट रात्रीत त्या चमकत्या लाटांमुळे संपूर्ण किनारपट्टी झळाळून निघाली होती. एका पाठोपाठ एक चमचमत्या लाटा किनाऱ्याकडे झेपावत होत्या.
चंद्राचे किरण परावर्तीत होतायत म्हणायचे तर आकाशात चंद्रही हजार नव्हता. लाटा नेमक्या कशामुळे चमकत आहेत हे काही तेव्हा उमगले नव्हते पण तो निसर्गाचा चमत्कार पाहत आम्ही बराच वेळ समुद्रावर रेंगाळलो. समुद्रा वरच्या गार वाऱ्यावर हा चमचमणारा समुद्र पाहत बाबांच्या मांडीवर केव्हा झोप लागली कळलेच नाही. झोपेमुळे चमचमणाऱ्या लाटा नजरे आड गेल्या पण ह्या रहस्या बद्दलच कुतूहल अनुत्तरीतच राहिलं.
कधी कधी नकळत पडलेल्या प्रश्नाची अगदी अनपेक्षित पणे उकल होते तशी ह्या चमकणाऱ्या लाटांचे रहस्य पुढे University चा Taxonomy चा कोर्स केला तेव्हा उलगडले.  पण पुन्हा कधी असा अनुभव घेता आला नव्हता.
गेल्या वर्षीच्या जुहू बीच वरील Bioluminescence च्या रिपोर्ट मुळे ह्या आठवणींन उजाळा मिळाला.  या वर्षी राजस आणी सारंग ने सोबत केल्यामुळे आमच्या मुंबईत याची देही याची डोळा हा चमत्कार पुन्हा एकदा अनुभवता आला. मात्र इथे मुंबईच्या झगमगाटा पुढे ह्या planktons चा Bioluminescence पार फिका पडला. कैक वर्षांपूर्वी गणपती पुळ्याच्या सागर किनारी पाहिलेल्या चमकत्या लाटांच्या झगमगाटने दिपलेल्या डोळ्यांना इथला फिक्या तेजाने काही फारसा दिलासा मिळाला नाही हेही तितकेच खरे.

P. C. : Rajas Deshpande


Bioluminescence बद्दल अधिक माहिती साठी आमच्या एका मित्राने लिहिलेला हा ब्लॉग पाहावा.
सौरभ सावंत Blog : http://saurabhsawant.in/2016/11/19/facts-bioluminescence-juhu-mumbai/ 

Thursday, November 17, 2016

कारवी बहर : एक अनोखा पुष्पोत्सव



हा लेख आजच्या साप्ताहिक सकाळ च्या अंकात छापून आला आहे, ज्यांना अंक मिळू शकत नाहीये, त्याच्यासाठी हा ब्लॉग

कारवी!! सह्याद्रीत तंगडतोड करणाऱ्यांना हा काही नवखा शब्द नाही. डोंगर उतारांवर वाढणारी ही झुडूप वजा वनस्पती म्हणजे सह्याद्रीला लाभलेले एक अमूल्य वरदानच म्हणायला हवे. सात आठ वर्षे उंच उंच वाढणारी ही झुडपे अशी काही दाट जाळी निर्माण करतात की भर उन्हाळ्यातही ह्या जाळीच्या छायेतून फिरताना उनाचा दाह जाणवू नये. एव्हडेच काय तर डोंगर उतारावरून मुरमाड मातीतून तोल सांभाळत उतरताना आधारासाठी मदतीचा हात पुढे करत उभी असतात ती हीच कारवीची झाडे. कारवीची मुळे जमिनीत अशी काही जाळी गुंफतात की वाऱ्या-पावसामुळे होणारी जमिनीची धूप आटोक्यात येते. जमिनीत खोल शिरणारी कारवीची मुळे पाण्याचा जमिनीतील पाझर वाढवून भूजल स्थर वाढवण्यास हातभार लावतात. ह्याच कारवीच्या दाट जाळीच्या आश्रयाला वाढतात अनेक ground orchids आणि lilies ज्याचे गुरांपासून संरक्षण करते ही करावी. कारवीची पाने जनावरांच्या चाऱ्यास उपयोगी पडतात. तर अनेक कीटकांना खाद्य, निवारा आणि संरक्षण मिळते ते ह्याच कारवीच्या झुडपांवर.

P.C. : Rajas Deshpande

ह्या कारवीचे अनोखे वैशिष्ट्य म्हणजे तीचे mass flowering (एकत्रित बहर), श्रुष्टीचा एक अलौकिक रंग सोहळा. ही झाडे सलग सात वर्ष वाढतात आणि आठव्या वर्षी सर्व झाडे एकाच वेळी फुलतात. जांभळ्या रंगाची टपोरी फुले लेऊन जेव्हा ही झाडे संपूर्ण बहरतात तेव्हा डोंगर उतारांना त्या रंगाच्या छटा प्राप्त होतात. ह्या फुलांमधे भरपूर पराग आणि मकर मिळतअसल्यामुळे मधमाशा ह्या बहराच्या वेळी कारवीच्या जाळीवरच डेरा देऊन बसतात. महाबळेश्वर भागात आदिवासी लोकं हा करावीच मध गोळा करतात. अधिक दाट आणि गडद रंगाच्या ह्या मधाची बाजारात चढ्या भावाने विक्री होते.

कारवीच्या आडोश्याला वाढणारे ground orchid

ह्या कारवीच्या आश्रयाला वाढणारे अनेक कीटक जंगलातील इतर वृक्षांच्या pollination (परागीभवना / परागीकरणा) मधे महत्वाची भूमिका निभावत असल्यामुळे कारवी जंगल संवर्धनास अप्रत्य रीत्या का होईना पण मोलाचा हातभार लावते. बहर ओसरलाकी कारवीची बोंडे सुकू लागतात. ह्या बोंडांवर तरळणारा चिकट तरल द्रव चाखायला गुरांना आवडते. बोंडा मधील बिया पक्व झाल्या की जीवन चक्रातील महत्वाची म्हणजेच प्रजननची आपली जबाबदारी पूर्ण केलेली ही झाडे आठ वर्षाची तपस्चर्या पूर्ण करून कृतज्ञतेने आपला जीवन काळ संपवतात. जून महिन्यात पहिल्या पावसाच्या सरीच्या माऱ्याने ही बोंडे तड तड आवाज करत फुटतात आणि त्या झटक्याने आतील बिया दूरवर भिरकावल्या जातात.











कारवीच्या मुळावर जगणारे परजीवी  Fungus

कारवीची दाट जाळी 
कारवी mass flowering मागचा मुख्य हेतू बिया खाणाऱ्या कीटकांपासून बियांचे संरक्षण. mass flowering मुळे इतक्या बिया विखुरल्या जातात की भलेही काही बिया कीटकांच्या भक्ष स्थानी पडल्या तरी नव्या फुटी साठी मुबलक बिया शिल्लक राहतात. हाच funda नैसर्गिक आपत्ती जसे दुष्काळ, वणवा यामुळे होणाऱ्या नुकासानालाही लागू पडतो. कारवीच्या उंचच उंच सरळसोट वाढणाऱ्या काड्यांचा वापर डोंगरकरी कुडाची घर बांधण्यासाठी करतात. एव्हडेच काय तर कारवी च्या मुळांवर काही परजीवी वनस्पती देखील वाढतात. अश्या ह्या बहुपयोगी करावीचा दर आठ वर्षांनी सह्याद्रीत फुलणारा असा हा आगळा पुष्पोत्सव मन भरून पाहण्याची माझी अनेक वर्षांपासूनची तीव्र इच्छा या वर्षी पूर्ण झाली.







कारवीच्या लांब कड्यांच्या आधारे वाढलेले कंदील पुष्पं
कारवी




टोपली कारवी


एक ते १४ वर्षे अंतराने फुलणाऱ्या कारवीच्या अनेक जाती आहेत. त्यातल्या त्यात डोंगर भटक्यांच्या परिचयाच्या दोन जाती म्हणजे तीव्र उताराच्या डोंगरावर उंच वाढणारी कारवी strobilanthes callosus आणि टेकडी अथवा पठारावर वाढणारी तुलनेने खुजी strobilanthes sessilis म्हणजेच टोपली कारवी.

कारवी मावळात, माळशेज घाटात, भंडारदरा तसेच त्र्यंबक परिसरात मुबलक पाहायला मिळते तर टोपली कारवी कास, चाळकेवाडी पठार, अंबोली, राधानगरी ह्या परिसरात मोठ्या प्रमाणात उगवते. २००८ साली झालेले कारवीचे mass flowering जरी मी पहिले असले तरी त्यावेळी कारवीच्या ह्या बहुपयोगी गुणधर्मांबद्दल असलेल्या अनभिज्ञते मुळे ह्या पुष्पोत्सावाचा मनमुराद आनंद लुटता आला नव्हता. गेल्या वर्षी पावसाची नाराजी झाल्यामुळे कारवी तुरळकच फुलली. तरी त्र्यंबक परिसरात बऱ्या पैकी बहार पाहायला मिळाला होता. कर्नाटकात निलकुरींजी नामक झुडपाचा दर १२ वर्षांनी फुलणारा बहर जसा डोंगर रांगांना जांभळ्या छटात रंगून देतो तसे दृश्य महाराष्ट्रात पहायची मनीषा फार वर्षांपासून मनात उचंबळत होती. यंदा सप्टेंबर मधे खुटे घाट चढाई दरम्यान करावीच उमदा बहर अनुभवला होता. mass flowering म्हणजे नेमक काय ह्याचा थोडक्यात प्रत्यय ह्या ट्रेक दरम्यान आला. पाय वाटेच्या दुतर्फा 5 ते ८ फुट उंच वाढलेली कारवीची झाडे जांभळ्या टपोऱ्या फुलांनी लगडली होती. पायाखाली गळून पडलेल्या फुलांनी जणू जांभळा गालिचाच अंथरला होता. नजर जाईल तेथे जांभळे कोंदण. कारवीच्या बहराचे सौदर्य शब्दात मांडता येणे कठीणच ते प्रत्यक्ष अनुभवायला हवे. 
डोंगर उतारावरील कारवीची जाळी 


ह्यानंतर चांदोली अभय अरण्यातील सड्यांच्या सफरी दरम्यानही असेच कारवीचे बहर पाहायला मिळाले. पण मनाला आस लागलेली ती संपूर्ण डोंगराला जांभळ्या रंगात रंगून देणारे बहर पाहण्याची. पुढे कामाच्या गडबडीत जाणे झालेच नाही. याही वर्षी ही इच्छा अपूर्णच राहतेकी काय असा प्रश्न मनाला भेडसावत असतानाच एका whats app group वर करमवीरभाई यांनी share केलेले काही फोटो पहिले. धुक्याशी लपंडाव खेळणारा डोंगर संपूर्ण जांभळ्या रंगात न्हाऊन निघालेला दिसत होता. हेच ते दृश्य, जे याची देही याची डोळा पाहण्याची तीव्र इच्छा मनात बाळगून बसलेय मी गेले कित्येक वर्ष. पण नेमकं कधी फुलावं कारवीने? गाठीशी महिनाभराच्या सुट्ट्या असूनही exam duty असल्यामुळे सुट्टी घेणे शक्य नव्हते. म्हणजेच हा बहर पाहायला आणखी निदान आठवडाभर तरी वाट पहावी लागणार होती. कारवीचा बहर तसा दोन तीन आठवडे टिकतो तरी उन वाढू लागले की फुले करपून जातात आणि बहर ओसरू लागतो.

यंदा हा बहर फुलला होता ते बागलाणातल्या साल्हेर गडावर. एव्हाना सप्टेंबर संपून ऑक्टोबर हिट सुरु झालेली. त्यात बागलाणातून पंधरवड्या पूर्वीच पावसाने काढता पाय घेतलेला. दिवसागणिक बहर ओसरत जाणार ह्या चिंतेने मन खट्टू होत होते. देवा ह्या वर्षी तरी मला हा बहर पाहण्याचे भाग्य लाभूदेत अशा विनवण्या करत कसा बसा आठवडा ढकलला. शनिवारचा semister closing चा दिवस अखंड धावपळीत गेला. कामे आटोपता आटोपता ऑफिस मधे बराच उशीर झालेला. घरी येऊन कसे बसे समान आवरले आणि एकदाचे नासिक कडे गाडी पिटाळली. अख्खी रात्र प्रवास करून पहाटे साल्हेर वाडीत पोहोचलो. गेल्या आठवडाभर कामासाठी झालेली धावपळ आणि रात्रीच्या प्रवासाचा शीण घालवण्यासाठी निदान २-३ तासाची शांत झोप आवश्यक होती. दोन तास झोप काढून आणि नाश्ता उरकून गड चढाईला सुरुवात केली तेव्हा सकाळचे ९ वाजले होते. ऑक्टोबर महिना असल्याने डोक्यावर सूर्य जणू आग ओकत होता. आठवड्याचे व्यस्त shedule, अपुरी झोप आणि त्यात हा उष्मा जीव काढत होता. धुळ्याहून आलेला एक group कुत्रं मागे लागल्या गत दौडत कधीच पुढे निघून गेला होता. आमच्या सोबत फोटोग्राफर मंडळी असल्यामुळे वळणा वळणावर केमेरे रोखले जात होते त्यामुळे जवळ जवळ सरपटत म्हणता येईल इतक्या संथ गतीने आम्ही किल्ला चढत होतो. एवढ्या उष्म्यात कारवीचा बहर शिल्लक असण्याच्या उरल्या सुरल्या आशा आता लोप पावू लागल्या होत्या.

तासाभरात पहिला दरवाजा ओलांडून माचीवर दाखल झालो. नवरात्र उलटून गेल्यावर सह्याद्रीत सगळीकडेच गवत उंचच उंच वाढू लागते. माचीवरही गवत चांगले कंबरभर उंच वाढले होते. पुढे पायवाटेच्या दुतर्फा रानाचा ताबा कारवीने घेतला. गळून गेलेली फुल, सुकलेल्या गळून पडलेल्या फुलांचा खच आणि हिरवीगार कारवी पाहून पुरता हिरमुस झाला. उशीरच झाला यायला. राहून राहून वाटत होते की मागच्या आठवड्यात येथे येणे व्हायला हवे होते. थोड्या दीडमूड अवस्थेतच पायऱ्या चढून पठारावर दाखल झालो. पठारावर शेवटच्या दरवाज्या समोरच कारवीचा एक ताटवा टवटवीत फुलं लेऊन वाऱ्या संगे खुशाल डोलत होता. त्याच्या दर्शनाने जीवात जीव आला. त्या फुलांना पाहून सहज विचार आला लेकांनो निदान तुम्ही तरी वाट पहिलीत आमची. शतशः धन्यवाद. दरवाजाच्या कमानीवरील टेहळणी बुरुजावर पोहोचून मागून येणाऱ्या राजस आणि सारंगना हाक मारली आणि मागे वळले. आता पहिल्यांदाच गड माथ्याकडे नजर गेली होती. समोर जे दृश्य दिसत होते त्यावर क्षणभर विश्वासच बसत नव्हता. हाच तो जांभळा पुष्पोत्सव. हीच ती रंगांची उधळण जी पाहण्याची मनीषा मला इथवर घेऊन आली होती.

हिमालयातील valley of flowers चे फोटो आपण नेहेमीच पाहत असतो. सड्या वरील रान फुलांचे रंगीत गालिचे पाहतो पण कारवीचा हा असा बहर हा एक आगळा अनुभव होता. पठारापासून सुरु झालेला हा जांभळा सडा, संपूर्ण डोंगर उतार व्यापून परशुरामाचे मंदिर असलेले शिखर चढून थेट परशुरामाच्या पादुकां पर्यंत पोहोचला होता. कोणीतरी अखंड डोंगर उतराला जांभळ्या – हिरव्या रंगाच्या नाजूक नक्षीदार  शालीत लापेटल्यासारखे भासत होते. हा संपूर्ण नझारा निव्वळ शब्दातीत होता. आम्ही चौघेहीजण स्थंभित होऊन कितीतरी वेळ डोंगराकडे नुसते पाहत उभे होतो.

P. C. : Sarang Naik


मागे एकदा एका लेखासाठी कारवीच्या बहरातून जाणाऱ्या पायवाटेचे फोटो आहेत का अशी विचारणा झाली होती. आज येथे असे शेकडो फोटो टिपता येणार होते. गुडघाभर उंची गाठलेल्या टोपली कारवीने अंतरा अंतरावर दाट जाळी गुंफत संपूर्ण पठार, डोंगर उतार आणि गड माथ्याचा ताबा घेतला होता. बऱ्यापैकी उंची गाठल्याने पाऊस नसला तरी येथे धुके सांदळून अद्याप बराच ओलावा शिल्लक होता. माचीच्या तुलनेत येथिल बहर अजून शाबूत असण्याचे बहुदा हेच कारण असावे. पायवाटेच्या दुतर्फा कारवीची गच्च जाळी पसरली होती. दोन अडीजफुट सरळसोट वाढलेल्या कारवीच्या दांड्यांवर फुट फुट उंचीचा चौफेर फुलोरा बहरला होता. झुडुपाच्या तळाशी गळून पडलेल्या फुलांचा खच पडला होता. वाऱ्यासवे डोलणारा हा जांभळा रंग आपल्या जिवंत पणाची जणू ग्वाही देत होता. Social media वर ह्या फुलोऱ्याचा अवाजवी गवगवा न झाल्याने गडावर सामसूम होती. अन्यथा आज गडावर जत्रा भरली असती. धुळ्याहून आलेला group गड माथ्यावर पोहोचला होता. कारवीच्या जाळीतून जेव्हा चालू लागलो तेव्हा फुलांवर घुटमळणाऱ्या असंख्य मधमाशांचा घु घु आवाज कानात घुमू लागला.

आयताकृती टाक्याच्या वरच्या बाजूला फुललेल्या कारवीचे पाण्यावर हेलकावणारे प्रतीबिंब पाहण्याचा आनंद काही औरच होता. यज्ञ वेदी ओलांडून आम्ही गुहेपाशी पोहोचलो. गुहे शेजारी कारवीच्या जाळीत दडून बसलेल्या रात किड्यांच्या टोळक्यांची एकमेकांशी जुगलबंदी सुरु होती. त्या निस्सीम शांततेत त्यांचा तो तालबद्द किरकिराटही कानांना गोड भासत होता. गुहेपासून गड माथ्याकडे कूच केले. जस जसे वर चढत होतो तस तसे कारवीच्या फुलांचा तजेला वाढत जात होता. फुलांवर सांदळलेले दव जणू फुलांच्या तजेल्याचे रहस्य उलगडून सांगत होते. निसर्गाच्या रंगमंचावर कारवीच्या बहराने मांडलेला हा पुष्पोत्सव इथे पार टिपेला पोहोचला होता. आणि या अद्भुत सोहळ्याचे रसिक साक्षीदार आम्ही पार मंत्रमुग्ध होऊन ह्या जांभळ्या रंगोत्सवाचा भान हरपून आस्वाद घेत होतो.

जांभळ्या जाळीतून नागमोडी वळणे घेत जाणारी पायवाट थेट गड शिखरावरील परशुराम मंदिरा पर्यंत पसरली होती. टेकडीवरील जांभळ्या जाळीत लक्ष वेधून घेतले ते आपले वेगळेपण मिरवत डौलात डोलणाऱ्या एकुलत्या एक पांढऱ्या कारवीच्या झुडूपाने. सूर्यनारायणाच्या ढगांशी चालेल्या लपंडावामुळे “कभी धूप कभी छाव” अनुभवायला मिळत होते. दुपारची न्याहारी आटोपून आम्ही अंग बधीर करणाऱ्या गार वाऱ्याचा कौल घेतला आणि मंदिरा समोरच्या चौथऱ्यावर अंग झोकून दिले. तास दीड तास कसा असरला कळलेच नाही. खडबडून जागे झालो ते शिखरावर पोहोचल्याच्या खुशीत गावातील एका पोराने फोडलेल्या एका कर्कश किंकाळीने. हातातील चायना मोबाईलवर सैराट पिच्चरची गाणी बेन्जोलाही लाजवील एव्हड्या मोठ्याने वाजवत थेट देव्हाऱ्यात घुसून देवाचे दर्शन घेऊन हे टोळके आले तसे सैराट वेगात उतरून निघूनही गेले. आम्ही उठून सामान आवरले तेव्हड्यात साटाण्याहून आलेले तीन गिर्यारोहक मंदिराशी पोहोचले. त्यांच्याशी चार गोष्टी बोलून आम्ही उतरायला सुरुवात केली.
उन्हे कलायला लागल्यामुळे तिरपी पडणारी सूर्य किरणे कारवीच्या जांभळ्या रंगला जणू सुवर्ण मुलामा देत होती. ह्या सोन पिवळ्या उन्हात कारवी अधिकच खुलून दिसत होती. गडमाथा उतरून आम्ही गंगासागर तलावापाशी आलो. रेणुका आईचे दर्शन घेऊन आम्ही तलावाच्या पलीकडे पोहोचलो. तलावाच्या स्थिर पाण्यावर डोंगराचे अखंड जांभळे प्रतीबिंब तरंगत होते. 

P. C : Sarang Naik


इतर मंडळी मावळतीच्या उजेडात जमेल तितक्या रंग छटा केमेऱ्यात टिपण्यात गढून गेलेली तर मी तेथेच तलावाच्या कट्ट्यावर बसून हा अनोखा निसर्ग चमत्कार डोळ्यात साठवून घेण्याचा प्रयत्न करत होते. समोरच्या आडव्या पसरलेल्या जांभळ्या जाळीत मला ओळखीचे स्मित हास्य उमटल्याचा उगाचच भास होत होता. जणू हा सह्याद्री मला सांगत होता की हो मी तुझीच वाट पाहत होतो. आठवडाभर तू करत असलेल्या विनवण्या माझ्या पर्यत पोहोचत होत्या. मन कृतज्ञतेने भरून आले आणि नकळत डोळ्याच्या कडा पाणावल्या.

“And, when you want something, all  the universe conspires in helping you to achieve it.” 

याची प्रचीती आज येत होती.

अखेर सूर्यराव क्षितिजा पलीकडे पसार झाले आणि अंधारू लागले तसे आम्ही गड उतरू लागलो. पठारावरून गडाचा निरोप घेताना पाय अडखळत होते, मनोमन सह्याद्रीला दंडवत घालून त्याचे शतशः आभार मानले. आजचा अनुभव जे काही समाधान देऊन गेला होता ते शब्दात व्यक्त करता येत नव्हते. खूप वर्षापासून मनात घर करून बसलेली एक सुप्त इच्छा आज पूर्ण झाली होती. किंबहुना अपेक्षे पेक्षा बरेच अधिक काही गवसले होते.

P.C. : Rajas Deshpande
पुढच्या आठ वर्षात माझ्या आयुष्यात आणि येथील पर्यावरणात काय काय बदल घडतील काही सांगता येणार नाही. त्यामुळे या वर्षी हे निसर्ग वैभव मनसोक्त अनुभवता आले हीच या वर्षीची मिळकत म्हणायची. हा अनुभव आयुष्य भारासाठी पुरणार आहे ह्यात शंकाच नाही. सह्याद्रीतील प्रत्येक सच्च्या भटक्याला आयुष्यात निदान एकदा तरी सह्याद्रीचे हे असे गोंडस रुप अनुभवता यावे हीच सह्याद्री चरणी प्रार्थना !! 

Sunday, October 30, 2016

!! पणती !!


ऐन दिवाळीच्या पहिल्या दिवशी आम्ही गावात पोहोचलो. सणासुदीच्या दिवशी आपल घरदार सोडून कोणी वाटाड्या आमच्या सोबत डोंगर वाटा धुंडाळायला यायची शक्यता तशी कमीच होती. दिवाळी म्हंटली की कंदील, रांगोळ्या, नवीन कपड्यात फटके उडवत हल्ला गुल्ला करत गावंभर फिरणारी पोर अस काहीस दृश्य पायला मिळणार या अपेक्षेने आम्ही गावात दाखल झालो. पण अपेक्षे पेक्षा गावात दिवाळीचा उत्साह काही पाहायला मिळाला नाही. एक दोन घर सोडता ना कुठे कंदील लटकत होता ना कोणाच्या अंगावर नवीन कापड झळाळत होती. सगळी कडे सामसुम होती. झोरे मामाही आमच्या येण्याने खूषच झालेले दिसत होते. पाचच मिनीटात तयार होऊन ते आमच्या सोबत यायला निघाले देखील. सगळच अनाकलनीय चित्र दिसत होत. ट्रेक संपवून गावात परतलो तेव्हा अंधार पडायला लागला होता. दिवाळी निमित्त दारा-दारात दोन पणत्या आणि इवलीशी रांगोळी तेव्हडी झळाळत होती. सकाळी ज्या घरांसमोर कंदील लटकताना पहिले होते त्या दारात दिवाळी आपल्या पद्धतीने साजरी केलेले कर्ते पुरुष मद्याधुंद अवस्थेत गावातील एक-एकाचा चढ्या आवाजात उन्द्धार करण्यात मश्गुल दिसत होते. सारच चित्र मन विषण्ण करणार होत.
मामांचा निरोप घेऊन आम्ही परतीच्या वाटेला लागलो. वाटेत अंबटेपच्या धनगर वाड्यापाशी थांबलो. खर तर आज दिवाळी. एकीकडे अंबटेप पासून हाकेच्या अंतरावर असलेली सहारा सिटी लाख लाख दिव्यांच्या रोषणाईने झगमगत होती. तर इथे साध्या विचेच्या सोयी पासून अद्याप वंचित असलेला हा धनगर वाडा मात्र दोन सौर दिव्यांच्या धूसर उजेडात आपली दैनंदिन कामे आटोपत होता. केव्हडा हा विरोधाभास!

दिवाळी निमित्त भिंतीच्या कोनाड्यात तेवेत होती ती ही एकुलती एक पणती !!


Wednesday, October 26, 2016

घाटवाटांच्या सानिध्यात



मध्यंतरी कोणत्यातरी एका व्हॉट्स अॅप ग्रुपवर सहजच कोणीतरी एक प्रश्न विचारला, ‘सह्याद्रीत एकूण घाट वाटा किती’? खरे तर अगदी साधा सरळ सहज प्रश्न. पण ह्याच उत्तर देणे या घाटवाटांइतकेच कठीण. 

पण ह्या प्रश्नामुळे मनात उठलेले घाटवाटांच्या चढाई-उतराईच्या सुरम्य आठवणीचे वादळ काही मला स्वस्थ बसू देईना. अप्पा (धनंजय मदन) आणि सुहास जोशींच्या आग्रहास्तव लोकप्रभा साप्ताहिकासाठी केलेले मोजके वृतांत लेखन वगळता आमच्या भटकंतीची तक्तेवार नोंदणी अशी आम्ही कधी केलीच नव्हती. लिखाणाचा प्रचंड कंटाळा असलेल्या माझ्यासारख्या आळशी जीवाला त्या ग्रुपवरच्या प्रश्नामुळे मात्र अखेर वही-पेन घेऊन बसायला भाग पाडले.
ह्या निमित्ताने गेल्या ७-८ वर्षात आम्ही धुंडाळलेल्या काही घाटवाटांचा घेतलेला हा आढावा !!


बहुतांश भटक्यांप्रमाणेच माझीही डोंगरवारी गडकिल्ल्यांपासून सुरु झाली. पहिल्याच दुर्गभ्रमणाने असे काही वेड लागले की मिळालेली प्रत्येक सुट्टी डोंगरातगड-किल्ल्यांच्या सान्निध्यात जाऊ लागली. डोंगरमोहीमांचा सपाटाच लागला. सह्याद्री कोळून प्यालेल्या प्रसाद तांदळे आणि रोहन राव सारख्या खंद्या मित्रांची सोबत लाभली. अशा अभ्यासू डोंगरभटक्यांची साथ ही कायमच महत्त्वाची ठरते.
गडावर जाताना चढणीची आणि उतरणीची वाट वेगळी असावीजरा अधिक पायपीट घडेलगडासोबतच माचीवरच्या वास्तू पाहता येतीलघे-यातील पायथ्याच्या गावातील ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाच्या वास्तू न्याहाळता येतील अशा बाबींचा विचार होऊ लागला. आणि भटकंतीला आकार येत गेला. थोड्या कठीण श्रेणीत मोडणा-या वाटांची निवड या अशा भटकंतीमुळे होऊ लागली. आणि आपसूकच अनेक घाटवाटांची सफर घडू लागली.



खरे तर सुरुवातीला आपण फिरतोय त्या डोंगरवाटा म्हणजेच कधीकाळच्या घाटवाटा हे लक्षात येईपर्यंत आमची १५-२० घाटवाटांची चढाई उतराई झाली होती. चार पाच वर्षांपूर्वी आनंद पाळंदे सरांचे डोंगरयात्रा हे पुस्तक हाती आले. त्यातील परिशिष्टात गवसला तो ४०-५० नव्हे तर तब्बल २२० घाट वाटांच्या माहितीचा खजिना. हे पुस्तक म्हणजे सह्यभ्रमंती करणाऱ्यासाठी बायबलच म्हणायला हरकत नाही. पुढे पुस्तकात दिलेल्या घाट वाटा फिरता फिरता पुस्तकात नमूद नसलेल्या पण अद्यापही चांगल्या वापरातल्या असलेल्या घाटवाटांची माहिती गावक-यांकडून मिळू लागली. मग एखाद्या ट्रेक दरम्यान स्थानिकांकडून मिळालेल्या नव्या माहितीच्या आधारे ह्या अनगड वाटा धुंडाळण्यासाठी ठरवून डोंगरात जाऊ लागलो. राजसयज्ञेश हे तर नेहमीचे ठरलेले साथीदार. आदित्य, प्रसाद तर होतेच. अधेमधे विशाल, पवन, जयेश, अमित अशी आमची गँग घाटवाटांनी हुंदडू लागली.
या अशा वाटांना नवीन वाटा म्हणता येणार नाही. या वाटा तर वर्षानुवर्षांपासून वापरत आहेत. कधी काळी आपल्या सारख्या डोंगर भटक्यांची आधीची पिढी कदाचित ह्या वाटांवरून चढून अथवा उतरून गेली असेल. गावकरी आता वाटा वापरत नसले तरी त्यांच्या अनेक पिढ्या याच वाटांच्या साक्षीने वाढल्या असतील. फरक इतकाच की आज या अशा वाटांचे लिखित दस्तऐवजीकरण उपलब्ध नव्हते. त्यामुळे फार फार तर आपण यांना नॉन डॉक्यूमेंटेड रुट’ म्हणू शकतो. 

म्हणूनच याची नोंद सुरु केली. ह्यातील काही वाटा पार मोडून गेल्या आहेत. तर काही न वापरल्यामुळे इतक्या दुर्गम झाल्या आहेत की त्या वाटेवर गिर्यारोहणातील तांत्रिक कौशल्याची गरज भासू शकते.
अहमदनगर जिल्ह्यातील घाटघरपासून ते सातारा जिल्हयाच्या कोकण सीमेवरील मेट शिंदीपर्यंतच्या घाटांवाटांची नोंद सुरु केली. ह्यापुढील सह्याद्रीच्या रांगेत कोयनादाजीपूर आणि राधानगरी अभयारण्यात समावीष्ट असल्यामुळे येथील बहुतांश भागात प्रवेश निषिद्ध आहे. त्यामुळे तेथील घाटवाटांची नोंद मुद्दामच या यादीत केली नाही. आजवर लिखित स्वरुपात नोंद न झालेल्या वाटांची यादीच करुन टाकली.  लवकरच या वाटांची लिखित माहीती थोडक्यात मांडायचा आमचा विचार आहे. 
भेटू लवकरच घाटवाटांचा गुंता सोडवायला. 



क्र.      घाट वाट       

२०११

१         आंबेनळी घाट                                                             
२         रीठ्याचे दार         
३         वाजंत्री घाट                    
४         दारा घाट           
५         धारेची वाट

          २०१२ – १३         

६         नाखिंदा घाट         
७         घोड्यापाण्याची नाळ   

          २०१४
         
८         घोडजीनाची नाळ      
९         अस्तान सरी              
१०        दौडा सरी           
११        तेली नाळ           
१२        देवदांडया     
       
        २०१५

१३        लिंग्या – निसणी     
१४        जननीची नाळ        
१५        वावळ्याची खैरण      
१६        फणस नाळ                
१७        नाळेची वाट              
१८        गवळणीची वाट         
१९        धटांची वाट          
२०        सरीची वाट          
२१        दऱ्याचा दांड         
२२        डोंबे सर                 
२३        चीपेचे दार           
२४        घोड नाळ           
२५        डुकरीण              
२६        काळकाई            
२७        आंब्याचे पाणी          
२८        तावली घाट
२९        घोड दांड            
३०        दावणीचा दांड        
३१        भेरंड नाळ             
३२        सात नाळ           
३३        चेरे माचीची वाट        
३४        पायरीची वाट        
३५        देव घाट   

          २०१६

३६        सोंड नाळ           
३७        वाघजाई घाट        
३८        केलाची नाळ         
३९        समणीची नाळ       
४०        माकड नाळ              
४१        वारस दार           
४२        पांडवाचे पाणी        

तोरण पट्टी, भक्त्याच नाकड, अंधारीची वाट, जांभूळ गांजी, म्हस नाळ, भूत्याची नाळ अशा अनेक वाटा अजूनही खुणावत आहेत. पाहूयात पुढचा मुहूर्त केव्हाचा लागतो ते.




Thursday, March 26, 2015

घाटवाटांचे पझल भाग २

शनिवारी अर्ध्या दिवसाची कल्टी मारुन दिवसा उजेडीच धामणहोळ गाठायचा प्लॅन होता. आदल्या खेपेला प्रचंड उष्म्याने झालेले हाल लक्षात घेता उन्हाळी ट्रेकच्या दृष्टीने माणशी निदान पाच लिटर पाणी सॅकमध्ये कोंबले. पवनला भरपूर ताकदही घ्यायच्या सूचना दिल्या. राजसने जलजीराचा स्टॉक घेतला. माझी सॅक, शूजरोप आणि इतर इक्विपमेंट लोड करून गाडी राजसच्या सुपूर्द केली. पण जैसे योजिले तसे घडावे तर तो ट्रेक कसला. राजस काही कामात अडकला आणि निघे निघेस्तोवर पाच वाजले. त्यात अवेळीच पावसाने हजेरी लावली. सगळं सुमंगल घडत होते. ना विंडचिटर घेतलेलं ना सामान प्लास्टिकमध्ये बांधलेलं. खंडाळा घाटात पोहोचलो आणि दुपारीच धामणहोळ गाठलेल्या चमूचा फोन आला, इथे रिमझिम पाऊस पडतोय आणि भरीस भर म्हणून गावकरी देव घाटाला सोडायचे सव्वा तीन हजार रुपये सांगत आहेत.

सव्वा तीन मी बसल्या जागीच उडाले.

काय करतेयस येतेयस की मागे फिरतेय. पलिकडून विचारणा झाली.

मागे फिरण्याचा प्रश्नच येत नाही. वाटाड्याचं उद्या पाहू सकाळी, कोणी नाही आल तर घुसू आपणच आणि पावसाच काय एवढं. पावसाळ्यात तरी काय आपण घरी बसतोय होय. होऊन जाऊ देत अवेळी मान्सून ट्रेक.

रात्री ११ वाजता गाडी गावात शिरली तेव्हा गाव चिडीचूप निजले होते. काळे दादांच्या व-हांड्यात सगळ्यांनी ताणून दिली. रात्रभर अखंड पाऊस कोसळत होता. सकाळचा पाच-साडेपाच-सहा-साडेसहाचा अलार्म बंद करत आम्ही निपचित पडून राहिलो. उठून करणार तरी काय होतो. आभाळ फाटल्यासारखा पाऊस कोसळत होता आणि सगळीकडे काळ्या मिट्ट अंधाराचं साम्राज्य होतं. अखेर सात वाजता जरा पावसाचा जोर कमी झाला. आम्ही पटापट आवारावर केली. दिनकर मामा अचानक आजारी पडले होते. गावातील इतर कोणालाही देव घाट अचूक माहीतच नव्हता. त्यात पावसामुळे रानात शिरायला कोणीच तयार होईनात. आता काय करावे विचार करत उभे होते एवढ्यात शंकरदादा समोर आले.

दादाबघाना कोणीच यायला तयार नाहीये. तुम्ही तरी चलानुसतं वाटेला लावून द्या, पुढे जाऊ आमचे आम्ही. आम्ही दादांना गळच घातली.

पण शंकरदादा देवघाटाने कधीच गेलेले नसल्यामुळे त्यांनी चौ-यापर्यंत सोडायचं कबूल केल्यावर आम्ही जास्ती ताणलं नाही. आलोच म्हणत दादा गावात गेले. पाच मिनिटांनी कुठूनशी दहा-बारा कुत्री आणि तीन-चार पोर बरोबर घेऊन दादा हजर. आता रानात जायचं म्हणजे कुत्री हवीतच आणि परतीला सोबतपण होईल या पोरांची. वाटेवर कुठं काय जनावर असंलरानात धोका असंल तर ही कुत्री आवाज करतील. असुदेत बरोबर  दादांच्या या लॉजिकवर काही न बोलता अखेरीस सव्वा आठ वाजता आमचा हा सारा ‘शाही’ लवाजमा देवघाटाकडे निघाला.

निसणी, लिंग्या घाट डावीकडे ठेवत आम्ही उजवीकडची डोंगररांग चढू लागलो. गावापासून १५ मिनिटे सरळ चालून मग एक टेकडी चढून पलीकडे पोहोचलो. वाट जुनी असली तरी कारवीचे रान माजले होते. शंकरदा कोयतीने कारवी छाटत चालाण्या पुरती वाट मोकळी करत होते. गावातून सोबत निघालेली श्वानगँग आणि दोन पोर वाट वाकडी करून कधी निसटली कळलंच नाही. उरले ते शंकरदा आणि त्यांचा राजामारुतीदादा आणि त्यांचा काळू. दोन्ही कुत्री पुढे पुढे धावून वाटेत काही धोका नसल्याची खात्री करत होती. मालकाने एक हाक दिली की परत शेजारी हजर. मालक थांबला की हे पण त्याच्या शेजारी येऊन बसत. ह्यांच्या इमानाला तोड नाही खरच.

टेकडी ओलांडून कड्यापाशी आलो. कारवीची जाळी जरा मोकळी केली तेव्हा लक्षात आलं आम्ही लिंग्या घाटातील नैसर्गिक गुहेच्या माथ्यावर उभे होतो. समोर लिंग्या घाटातून दिसलेली दरी पसरली होती. त्यापलीकडे उजवीकडे दूरवर उंबर्डी गाव आणि नाकासमोर कुर्डूगडाचा सुळका. त्यापलीकडे थिबथिब्या ते माजुर्णे पर्यंतची सह्याद्रीची रांग ढगांशी लपंडाव खेळत होती.

देव घाटाच्या वाटेवरून दिसणारा कुर्डूगड 
घाटावरची बोचरी हवा अंगावर शहारे आणत होती. त्यातच अधूनमधून येणा-या सरींमुळे चांगलेच भिजायला झाले होते आणि अधिकच थंडी वाजत होती. आणखी एका टेकडीच्या पायथ्याशी फेरा घालत आम्ही एका घळीत पोहोचलो. चालता चालता मारुतीदादांशी गप्पा रंगू लागल्या. एक मुलगी अशी दूरवर डोंगरवाटा तुडवत इथवर येते ह्याचं त्यांना विलक्षण कौतुक वाटत होतं. प्रत्येक टप्प्यावर मी व्यवस्थित पोहोचतेय की नाही ह्याकडे त्यांच नीट लक्ष होतं. त्यांना जंगलाची बरीच चांगली माहीती दिसत होती. त्यांच्याकडून दीपाच्या वनाची माहिती मिळाली आणि पुन्हा एकदा धामणहोळला येणे होणार हे निश्चित झाले.

गावापासून साधारण तासभराच अंतर कापल्यावर आम्ही एका खिंडीपाशी पोहोचलो. डावीकडे एक मोठी वाट उतरत होती. ही वाटदेखील कारवीत बुडालेली. समोर दिसणाºया खिंडीच्या डावीकडे डोंगर माथ्यावर भलमोठ सपाट गवताळ मैदान दिसत होतं. गावकरी याला दुर्गाडी म्हणतात. मैदानावर गुरांना चरण्यासाठी आणल जातत्यामुळे इथवरची वाट जरा तरी शाबूत आहे.

देव घाट पहिला टप्पा सुरुवात 
हा बघा मॅडम देवघाट हितनचं सुरु होतो. शंकरादादांनी डावीकडे वळण्याचा इशारा केला. दादा पुढे होऊन कोयत्याने फांद्या छाटत वाट मोकळी करत होते. पाचच मिनिटात वाट पुन्हा झाडांच्या दाट जाळीशी येऊन लुप्त झाली. एवढी मोठी झाड तोडत जाण्यापेक्षा बाजूच्या पाण्याच्या मार्गाने उतरणे अधिक रास्त होते. मारुती दादा सांगू लागले, इथून चौºयापर्यंत चांगल्या घडीव दगडी पाय-या बांधलेल्या होत्या. पण वापर नसल्यामुळे ३०-४० वर्षात जंगलाने सगळ्याचा ताबा घेतलाय.

आता पावसाने चांगलाच जोर धरला होता. रात्रभर झालेल्या पावसामुळे निसरड्या झालेल्या दगडावर कसाबसा तोल सांभाळतझाडांच्या फांद्या चुकवत आम्ही उतरू लागलो. ओल्या दगडावर बिलकुल ग्रीप न देणारे माझे वैनब्रेनर शूज सारखे घसरत होते. एकंदर वेग फारच मंदावला होता.

थोड्या थोड्या अंतरावर दादा उजवीकडे जंगलात घुसून पायवाट शोधत होते. आम्हाला दुर्गाडीच्या डोंगराला वळसा घालून पदरातील गवताळ मैदानावर पोहचायचे होते. ह्याच टप्प्यावर पाण्याची दोन टाकी खोदलेली आहेत. मैदान साधारण चौकोनी आकाराचे असल्यामुळे ह्याला चौºया म्हणत असावेत बहुतेक. साधारण अर्धा तास नळीतून घसरपट्टी करून अखेर आम्ही पायवाटेला लागलो. घनदाट जंगलातून चालताना उजवीकडे दुर्गाडीचा कडा आणि डावीकडे लिंग्या घाटातून दिसलेली दरी असा आमचा प्रवास सुरु झाला. एके ठिकाणी रान मोकळे झाले आणि आम्ही दरीच्या तोंडाशी पोहोचलो. 
देव घाट : लिंग्या घाट यांच्या माधीन दरी 

समोर कुर्डू गडाचा सुळकाडावीकडे लिंग्या घाटाची घळ आणि मध्ये दरीअसा नयनरम्य नजारा दिलखुश करून गेला. दरी डावीकडे ठेऊन चिंचोळ्या वाटेने पुढे होत आम्ही दहा मिनिटात चौ-यावर पोहोचलो.

मागच्याच रविवारी समोर लिंग्या घाटाच्या कड्यापाशी बसून ह्या मैदानाकडे पाहताना इथे कसं पोहोचता येईल ह्याचा विचार करताना वाटलं नव्हतं इतक्या लवकर येथे पोहचू म्हणून. संपूर्ण पठारावर सोन पिवळ गवत उगवलेलं आणि लागवड केल्यागत एका रांगेत असलेली ऐनाची निष्पर्ण झाडं दिमाखात डोलत होती. पाण्याच्या टाक्यापाशी मंडळी जरा विसावली. 
चौऱ्या वरील पाण्याची टाकी
शंकरदादा आणि मारुतीदाद पठाराच्या टोकाशी जाऊन खाली घळीकडे उंगली निर्देश करत काहीतरी गहन चर्चा करण्यात गढून गेले होतेआणि त्यांचे इमानी सवंगडी जस काही सगळं उमजत असाव अशा अविर्भावात ऐकत होते. 


मारुतीदादांनी आम्हाला येथूनच उजवीकडच्या घळीतून उतरणारी वाट समजावून दिली. एकदा कोकणात उतरलात की ओढ्याच्या बाजूने चालत गेलात म्हणजे तासाभरात उंबर्डीत पोहोचाल इति मारुतीदादा.

उंबर्डी तसं बरंच लांब दिसत होत. त्यात घाट वाट कशी असेलउतरायला किती वेळ लागेल ह्याचा काहीच अंदाज बांधता येत नव्हता. मारुतीदादांकडून लिंग्याघाट कुठून चढतो ते समजावून घेतले. उंबर्डीत जाण्यापेक्षा लिंग्या घाटाने पदरात पोहोचून कुर्डूगड पेठ गाठणे जास्त रास्त वाटत होते.

शंकरदादांना इथून पुढच्या वाटेची जराही कल्पना नव्हती. एकटेच आले असते तर कदाचित आम्हाला इथवर सोडून ते परत गेले असते. पण कोयता हाती घेऊन मारुतीदादा पुढे झाले. जंगल इतकं दाटत्यात काळवंडलेल आभाळजणूकाही संधीप्रकाशातच वाटचाल करत होतो. वाट अजिबातच नाहीमोठ्या मोठ्या वेलींची जाळी जमिनीपर्यंत गुंतत गेलेली. आधाराला फांदी धरावी तर बोटात काटे रुतत होते. वेली फांद्यांच्या जाळीतून कसेबसे घसपटत साधारण १५ मिनिटात आम्ही एका घळीच्या तोंडाशी येऊन पोहोचलो. समोरच्या पदरावर चौºया सारखेच गवताळ मैदान दिसत होते. घळीच्या तोंडाशी रचून ठेवलेल्या दगडांवरून लगेच लक्षात आलं की, ही देवाघाटाच्या दुसºया टप्प्याची सुरुवात असणार. पाऊस थांबण्याचे काही चिन्ह दिसत नव्हते.

मारुतीदादा डावीकडे हात करत घळ न सोडता नाकासमोर उतरण्याची सूचना करत म्हणाले, अजिबात डाव उजवं घुसायच नाही. आम्ही इथनं मागे फिरतो. पुढची वाट आम्हाला माहित नाही. कोकणातील लोक हितन गुर घेऊन यायचे तेवढंच ऐकिवात आहे....

शंकरदादांनी जबाबदारी संपल्याचं सांगत सांभाळून जायला सांगत, वाट गावली नाही तर गुमान माग फिरुन गावात येण्याची दटावणी गेली.

देव घाट दुसरा टप्पा सुरुवात
दुपारचे १२ वाजून गेले होतेआता पावसाचा जोर वाढू लागला. आम्ही पटापट उतरायला सुरुवात केली. दगडाने आच्छादलेल्या नागमोडी वाटेवर मोठ मोठे वृक्ष कब्जा करून बसले होते. दहा मिनिटे उतरत वाट सरळ पुढे बाजूच्या घळीत शिरली. जंगलाच्या जाळीतून बाहेर पडून मोकळ्यात आलो आणि पठारावरून मामांची हाक ऐकू आली. मागे फिरा वरच्या घळीतून उतारा ह्या घळीत टप्पे आहेत.

धन्य ते मारुतीदादा. किती काळजी करावी आमची. आणखी बराचवेळ मारुतीदादा ओ देत राहिले. घळीत आमचा आवाज जसजसा आणखी खोल जाऊ लागला तसे ते दोघे गावाकडे निघाले.

जरा खाली उतरताच वेलींच्या जाळीने वाट अडवली. त्यात घुसणे अशक्यच होते. बाजूनेच वाहणाºया पाण्याच्या वाटेला लागण्याशिवाय पर्याय नव्हता. मोठ मोठे खडक उतरत पुढचा प्रवास सुरु झाला. पाऊस थांबायचे चिन्ह नसल्याने उभ्या उभ्याच नाचणी चिप्स आणि ताक ढकलून भुकेल्या पोटाला जरा आधार दिला. पाठीवरच्या सॅकमध्ये पाच लिटर पाणी होते आणि त्यातले अजून घोटभरदेखील वापरले नव्हते. वातावरणातल्या गारव्यामुळे तहान अशी लागलीच नव्हती. दगडावरून वाहणारे गार पाणी तोंडाचा चंबू करून गटकण्यातली मजा काही औरच होती. तासाभरात आम्ही कोकणात उतरलो. उंबर्डी गाठायचे म्हणजे तासाभराची चाल होती. तो विचार सोडून सरळ लिंग्या घाटाने पदरात पोहोचायचे ठरले. पण त्याआधी ओहोळाच्या शेजारी एक सपाट दगड हेरून पोटोबा शांत करून घेतला.

गावच्या वाटाड्याची जागा प्रसादने घेतली. आमचा खाणं उरकायच्या आत हा जंगलातून ओरडत आला वाट मिळालीये. खरतर वाट नव्हती मिळालीपण कोळी राजाच्या वाड्याचे जोते मिळाले होते. रात्री गावक-यांशी झालेल्या देवघाटाबद्दलच्या गप्पांमध्ये घाटाच्या सुरुवातीला कोकणात कोळी राजाच्या वाड्याचे अवशेष अजूनही पाहायला मिळतील असे कळले होतेत्याचीच पुष्टी झाली होती. लिंग्या घाटाची पायवाट इथूनच कुठूनतरी जात असणार ह्यात शंका नव्हती. 
कोळी राजाच्या वाड्याचे अवशेष

वाड्याचे सगळे अवशेष पाहून डोंगर कडा डावीकडे ठेवतदगड झुडपाच्या जाळीतून आम्ही चढायला सुरुवात केली. नेहेमीप्रमाणे प्रसाद सगळ्यात पुढे होता. वाटेत येणाºया वेली-फांद्या  साफ करत त्याची चढाई फारच धीम्या गतीने होत होती. मला अश्या मुंगीच्या वेनागे पुढे सरकायचा कंटाळा आलेला. एक दोनदा त्याला ओरडले की नको करूस वाट मोकळी आम्ही येतो कसेही. पण त्याने त्याकडे सपशेल दुर्लक्ष केले. अखेर वैतागून मी आपली स्वत:ची वाट काढत झपाझप पुढे गेलेयज्ञेश आधीच डावीकडून वर चढून आला होता. थोडा आणखी चढलो आणि अखेर स्पष्ट पायवाटेला लागलो.

हाच तो लिंग्या घाटधामणहोळ ते उंबर्डी अशी ये-जा सतत सुरु असल्यामुळे वाट चांगली मळलेली आहे. रस्त्यात खुणेसाठी दगडांवर तसेच झाडांवर पांढºया रंगाने वर्तुळं काढलेले आहेत. दुपारचे सव्वादोन वाजले होते. इथून पदरात पोहोचून कुर्डूपेठ गाठून चीपेच्या दाराने चढून जाण्यासाठी पुरेसा वेळ हातात होता. तसाच विचार करून पटापट चढायला लागलो.

निशाणीच्या वाटेवरून दिसणारा देव घाट 
पदरात पोहोचतोय ना पोहोचतोय तोच संपूर्ण परिसर धुक्यात गडप झाला. आकाशात काळ्या ढगांनी गर्दी केली आणि पावसाला सुरुवात झाली. तीनच वाजले होते पण नवी वाट चढायची आणि सभोवतालचा परिसरच पाहता येणार नसेल तर काही अर्थच नाही ना. नाईलाजाने चीपेच्या दाराचा विचार सोडून दिला आणि आम्ही निसणीच्या वाटेला लागलो. वाघजाईच्या ठाण्याशी पोहोचलो तेव्हा साडेतीन पावणे चार वाजले असावेत. छत्रीत जाऊन विसावलो आणि दहाच मिनिटात सगळ धुकं विरून गेलं. काळे मेघ वा-यासोबत पुढे निघून जाऊ लागले. आजूबाजूचा सगळा परिसर सायंकाळच्या सोनपिवळ्या प्रकाशात उजळून निघाला होता. निसर्गाने चांगलीच थट्टा केली होती आमची. समोर चीपेचं दार खुणावत होतंपण आता पुरेसा वेळ शिल्लक नव्हता. डोंगराकडे पाहत मनातल्या मनातच म्हटलं, राहिलं मित्रा या खेपेला पण येऊ लवकरच तुला भेटायला. पवनने त्याच्या पोर्टेबल स्टोव्हवर गरमागरम सूप बनवून दिलं. दिवसभर भिजल्यामुळे भरलेली हुडहुडी कमी व्हायला जरा मदत झाली.

पुन्हा एकदा खादाडी उरकून आम्ही गावाकडे निघालो. वाटेत जुन्या मंदिरापाठची दगडी विहीर पाहून आम्ही गावात पोहोचलो. आमचे दोन्ही वाटाडे आमच्या वाटेकडे डोळे लाऊन बसले होते. शंकर दादांनी चहा घेतल्याशिवाय जाल तर बघा अशी तंबीच दिल्यामुळे कपडे बदलून सॅका आवरून आम्ही दादांच्या घरी गेलो. चहा घेताघेता पुन्हा एकदा घाट वाटेची माहिती तपशीलवार लिहून घेतली.

गप्पा मारताना शंकरदादानी पुढच्या खेपेला चीपनं उतरू आणि दीपानं वर येउ असा कर्जत कसारासारखा भलामोठा क्रॉसकंट्री तंगडतोड ट्रेकचा प्लान मांडला. दोन वेळा आडवाटा धुंडाळून सुखरुप परत आल्यामुळे बहुदा आमच्या स्टॅमिन्यावर शंकरदादांना भलताच कॉन्फिडन्स आलेला दिसत होता. पोर चालत्यात तर ब्येस फिरवू शकतो ह्यांना!!!

पुन्हा यायचा वायदा करत जड अंत:करणाने गावक-यांना निरोप दिला. गाव सोडला तेव्हा पावसाची रिमझिम सुरु झालेली. लोणावळा-खंडाळा घाटात पावसाने अक्षरश: झोडपून काढले. घरी पोहोचायला रात्रीचा एक वाजला. आंघोळ करून सुईने हातात रुतलेले काटे काढायला बसले. एकदोनतीनचार ... मोजणेच सोडून दिले. एवढी भटकंती केली सह्याद्रीतपण घाटवाटेवर एव्हढं दाट जंगलं वाढल्याचं पाहीलं नव्हतं. मारुतीदादा नसते आले तर वाट सापडण जवळजवळ अशक्यचं होतं. चीपेचं दार राहीलं असलं तरी लिंग्या घाट पूर्ण झाला होती. त्याहूनही अधिक समाधान म्हणजे अखेर आठवडाभर डोक्याला मुंग्या आणणा-या प्रश्नाची उकल झाली होती.

मात्र आम्ही केलेली भटकंती आणि नोंदी पडताळून पाहणे गरजेचे होते. त्यासाठी डोंगरयात्रेतील गुरु आनंद पाळंदे सरांशी बोलून त्यांना ब्लॉग पाठवून दिला. त्यांनी देखील आत्मीयतेने सारे तपशील वाचले आणि एकेदिवशी त्यांचा फोन आला. आमच्या तपशीलवार नोंदीचे कौतुक केले आणि देवघाटाच्या आमच्या भटकंतीमुळे त्यांच्या नोंदीत भर पडल्याचे सांगितले. हा खरा आनंदचा क्षण होता.

सह्याद्रीत आता नवीन भटकण्यासारखे, नोंदविण्यासारखे काहीच नाही असे एक पालुपद गेली अनेक वर्षे अनेकवेळा अनेकांकडून ऐकायला मिळाले होते. मात्र आमचा छोटासा चमू गेली सात आठ वर्षे ठरवून आडवाटांवरच भटकत होता. गावक-यांच्या बोलण्यात नवे संदर्भ मिळायचे, कधी ते पडताळून पाहता यायचे कधी काहीच माग लागायचा नाही. धामणओहोळात मात्र देवघाटाने आम्हाला अशाच एक विस्मृतीत गेलेल्या वाटेवर आणले. अनेक वर्षे वावर नसलेल्या वाटेवर मनसोक्त भटकता आले. पाण्याची टाकी, कोळी राजाच्या वाड्याचे चौथरे अशा खुणांनी घाट राबता असल्याचे दाखवून दिले. आणि सह्याद्रीतदेखील अजून शोधायला भरपूर वाव आहे याची प्रचीती आली.

डोंगरात भटकायचे कशासाठी, आनंदासाठी तर नक्कीच. पण नव्याची आस ठेऊन असे काही मिळालच तर तोच आनंद शतगुणित झाला अस म्हणायला काहीच हरकत नाही. 

Photo courtesy : Prasad Tandale
 
 
Blogger Templates