Social Icons

Pages

Sunday, October 30, 2016

!! पणती !!


ऐन दिवाळीच्या पहिल्या दिवशी आम्ही गावात पोहोचलो. सणासुदीच्या दिवशी आपल घरदार सोडून कोणी वाटाड्या आमच्या सोबत डोंगर वाटा धुंडाळायला यायची शक्यता तशी कमीच होती. दिवाळी म्हंटली की कंदील, रांगोळ्या, नवीन कपड्यात फटके उडवत हल्ला गुल्ला करत गावंभर फिरणारी पोर अस काहीस दृश्य पायला मिळणार या अपेक्षेने आम्ही गावात दाखल झालो. पण अपेक्षे पेक्षा गावात दिवाळीचा उत्साह काही पाहायला मिळाला नाही. एक दोन घर सोडता ना कुठे कंदील लटकत होता ना कोणाच्या अंगावर नवीन कापड झळाळत होती. सगळी कडे सामसुम होती. झोरे मामाही आमच्या येण्याने खूषच झालेले दिसत होते. पाचच मिनीटात तयार होऊन ते आमच्या सोबत यायला निघाले देखील. सगळच अनाकलनीय चित्र दिसत होत. ट्रेक संपवून गावात परतलो तेव्हा अंधार पडायला लागला होता. दिवाळी निमित्त दारा-दारात दोन पणत्या आणि इवलीशी रांगोळी तेव्हडी झळाळत होती. सकाळी ज्या घरांसमोर कंदील लटकताना पहिले होते त्या दारात दिवाळी आपल्या पद्धतीने साजरी केलेले कर्ते पुरुष मद्याधुंद अवस्थेत गावातील एक-एकाचा चढ्या आवाजात उन्द्धार करण्यात मश्गुल दिसत होते. सारच चित्र मन विषण्ण करणार होत.
मामांचा निरोप घेऊन आम्ही परतीच्या वाटेला लागलो. वाटेत अंबटेपच्या धनगर वाड्यापाशी थांबलो. खर तर आज दिवाळी. एकीकडे अंबटेप पासून हाकेच्या अंतरावर असलेली सहारा सिटी लाख लाख दिव्यांच्या रोषणाईने झगमगत होती. तर इथे साध्या विचेच्या सोयी पासून अद्याप वंचित असलेला हा धनगर वाडा मात्र दोन सौर दिव्यांच्या धूसर उजेडात आपली दैनंदिन कामे आटोपत होता. केव्हडा हा विरोधाभास!

दिवाळी निमित्त भिंतीच्या कोनाड्यात तेवेत होती ती ही एकुलती एक पणती !!


Wednesday, October 26, 2016

घाटवाटांच्या सानिध्यात



मध्यंतरी कोणत्यातरी एका व्हॉट्स अॅप ग्रुपवर सहजच कोणीतरी एक प्रश्न विचारला, ‘सह्याद्रीत एकूण घाट वाटा किती’? खरे तर अगदी साधा सरळ सहज प्रश्न. पण ह्याच उत्तर देणे या घाटवाटांइतकेच कठीण. 

पण ह्या प्रश्नामुळे मनात उठलेले घाटवाटांच्या चढाई-उतराईच्या सुरम्य आठवणीचे वादळ काही मला स्वस्थ बसू देईना. अप्पा (धनंजय मदन) आणि सुहास जोशींच्या आग्रहास्तव लोकप्रभा साप्ताहिकासाठी केलेले मोजके वृतांत लेखन वगळता आमच्या भटकंतीची तक्तेवार नोंदणी अशी आम्ही कधी केलीच नव्हती. लिखाणाचा प्रचंड कंटाळा असलेल्या माझ्यासारख्या आळशी जीवाला त्या ग्रुपवरच्या प्रश्नामुळे मात्र अखेर वही-पेन घेऊन बसायला भाग पाडले.
ह्या निमित्ताने गेल्या ७-८ वर्षात आम्ही धुंडाळलेल्या काही घाटवाटांचा घेतलेला हा आढावा !!


बहुतांश भटक्यांप्रमाणेच माझीही डोंगरवारी गडकिल्ल्यांपासून सुरु झाली. पहिल्याच दुर्गभ्रमणाने असे काही वेड लागले की मिळालेली प्रत्येक सुट्टी डोंगरातगड-किल्ल्यांच्या सान्निध्यात जाऊ लागली. डोंगरमोहीमांचा सपाटाच लागला. सह्याद्री कोळून प्यालेल्या प्रसाद तांदळे आणि रोहन राव सारख्या खंद्या मित्रांची सोबत लाभली. अशा अभ्यासू डोंगरभटक्यांची साथ ही कायमच महत्त्वाची ठरते.
गडावर जाताना चढणीची आणि उतरणीची वाट वेगळी असावीजरा अधिक पायपीट घडेलगडासोबतच माचीवरच्या वास्तू पाहता येतीलघे-यातील पायथ्याच्या गावातील ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाच्या वास्तू न्याहाळता येतील अशा बाबींचा विचार होऊ लागला. आणि भटकंतीला आकार येत गेला. थोड्या कठीण श्रेणीत मोडणा-या वाटांची निवड या अशा भटकंतीमुळे होऊ लागली. आणि आपसूकच अनेक घाटवाटांची सफर घडू लागली.



खरे तर सुरुवातीला आपण फिरतोय त्या डोंगरवाटा म्हणजेच कधीकाळच्या घाटवाटा हे लक्षात येईपर्यंत आमची १५-२० घाटवाटांची चढाई उतराई झाली होती. चार पाच वर्षांपूर्वी आनंद पाळंदे सरांचे डोंगरयात्रा हे पुस्तक हाती आले. त्यातील परिशिष्टात गवसला तो ४०-५० नव्हे तर तब्बल २२० घाट वाटांच्या माहितीचा खजिना. हे पुस्तक म्हणजे सह्यभ्रमंती करणाऱ्यासाठी बायबलच म्हणायला हरकत नाही. पुढे पुस्तकात दिलेल्या घाट वाटा फिरता फिरता पुस्तकात नमूद नसलेल्या पण अद्यापही चांगल्या वापरातल्या असलेल्या घाटवाटांची माहिती गावक-यांकडून मिळू लागली. मग एखाद्या ट्रेक दरम्यान स्थानिकांकडून मिळालेल्या नव्या माहितीच्या आधारे ह्या अनगड वाटा धुंडाळण्यासाठी ठरवून डोंगरात जाऊ लागलो. राजसयज्ञेश हे तर नेहमीचे ठरलेले साथीदार. आदित्य, प्रसाद तर होतेच. अधेमधे विशाल, पवन, जयेश, अमित अशी आमची गँग घाटवाटांनी हुंदडू लागली.
या अशा वाटांना नवीन वाटा म्हणता येणार नाही. या वाटा तर वर्षानुवर्षांपासून वापरत आहेत. कधी काळी आपल्या सारख्या डोंगर भटक्यांची आधीची पिढी कदाचित ह्या वाटांवरून चढून अथवा उतरून गेली असेल. गावकरी आता वाटा वापरत नसले तरी त्यांच्या अनेक पिढ्या याच वाटांच्या साक्षीने वाढल्या असतील. फरक इतकाच की आज या अशा वाटांचे लिखित दस्तऐवजीकरण उपलब्ध नव्हते. त्यामुळे फार फार तर आपण यांना नॉन डॉक्यूमेंटेड रुट’ म्हणू शकतो. 

म्हणूनच याची नोंद सुरु केली. ह्यातील काही वाटा पार मोडून गेल्या आहेत. तर काही न वापरल्यामुळे इतक्या दुर्गम झाल्या आहेत की त्या वाटेवर गिर्यारोहणातील तांत्रिक कौशल्याची गरज भासू शकते.
अहमदनगर जिल्ह्यातील घाटघरपासून ते सातारा जिल्हयाच्या कोकण सीमेवरील मेट शिंदीपर्यंतच्या घाटांवाटांची नोंद सुरु केली. ह्यापुढील सह्याद्रीच्या रांगेत कोयनादाजीपूर आणि राधानगरी अभयारण्यात समावीष्ट असल्यामुळे येथील बहुतांश भागात प्रवेश निषिद्ध आहे. त्यामुळे तेथील घाटवाटांची नोंद मुद्दामच या यादीत केली नाही. आजवर लिखित स्वरुपात नोंद न झालेल्या वाटांची यादीच करुन टाकली.  लवकरच या वाटांची लिखित माहीती थोडक्यात मांडायचा आमचा विचार आहे. 
भेटू लवकरच घाटवाटांचा गुंता सोडवायला. 



क्र.      घाट वाट       

२०११

१         आंबेनळी घाट                                                             
२         रीठ्याचे दार         
३         वाजंत्री घाट                    
४         दारा घाट           
५         धारेची वाट

          २०१२ – १३         

६         नाखिंदा घाट         
७         घोड्यापाण्याची नाळ   

          २०१४
         
८         घोडजीनाची नाळ      
९         अस्तान सरी              
१०        दौडा सरी           
११        तेली नाळ           
१२        देवदांडया     
       
        २०१५

१३        लिंग्या – निसणी     
१४        जननीची नाळ        
१५        वावळ्याची खैरण      
१६        फणस नाळ                
१७        नाळेची वाट              
१८        गवळणीची वाट         
१९        धटांची वाट          
२०        सरीची वाट          
२१        दऱ्याचा दांड         
२२        डोंबे सर                 
२३        चीपेचे दार           
२४        घोड नाळ           
२५        डुकरीण              
२६        काळकाई            
२७        आंब्याचे पाणी          
२८        तावली घाट
२९        घोड दांड            
३०        दावणीचा दांड        
३१        भेरंड नाळ             
३२        सात नाळ           
३३        चेरे माचीची वाट        
३४        पायरीची वाट        
३५        देव घाट   

          २०१६

३६        सोंड नाळ           
३७        वाघजाई घाट        
३८        केलाची नाळ         
३९        समणीची नाळ       
४०        माकड नाळ              
४१        वारस दार           
४२        पांडवाचे पाणी        

तोरण पट्टी, भक्त्याच नाकड, अंधारीची वाट, जांभूळ गांजी, म्हस नाळ, भूत्याची नाळ अशा अनेक वाटा अजूनही खुणावत आहेत. पाहूयात पुढचा मुहूर्त केव्हाचा लागतो ते.




 
 
Blogger Templates