ऐन दिवाळीच्या पहिल्या दिवशी आम्ही गावात
पोहोचलो. सणासुदीच्या दिवशी आपल घरदार सोडून कोणी वाटाड्या आमच्या सोबत डोंगर वाटा
धुंडाळायला यायची शक्यता तशी कमीच होती. दिवाळी म्हंटली की कंदील, रांगोळ्या, नवीन
कपड्यात फटके उडवत हल्ला गुल्ला करत गावंभर फिरणारी पोर अस काहीस दृश्य पायला
मिळणार या अपेक्षेने आम्ही गावात दाखल झालो. पण अपेक्षे पेक्षा गावात दिवाळीचा
उत्साह काही पाहायला मिळाला नाही. एक दोन घर सोडता ना कुठे कंदील लटकत होता ना
कोणाच्या अंगावर नवीन कापड झळाळत होती. सगळी कडे सामसुम होती. झोरे मामाही आमच्या
येण्याने खूषच झालेले दिसत होते. पाचच मिनीटात तयार होऊन ते आमच्या सोबत यायला
निघाले देखील. सगळच अनाकलनीय चित्र दिसत होत. ट्रेक संपवून गावात परतलो तेव्हा
अंधार पडायला लागला होता. दिवाळी निमित्त दारा-दारात दोन पणत्या आणि इवलीशी
रांगोळी तेव्हडी झळाळत होती. सकाळी ज्या घरांसमोर कंदील लटकताना पहिले होते त्या
दारात दिवाळी आपल्या पद्धतीने साजरी केलेले कर्ते पुरुष मद्याधुंद अवस्थेत गावातील
एक-एकाचा चढ्या आवाजात उन्द्धार करण्यात मश्गुल दिसत होते. सारच चित्र मन विषण्ण
करणार होत.
मामांचा निरोप घेऊन आम्ही परतीच्या वाटेला
लागलो. वाटेत अंबटेपच्या धनगर वाड्यापाशी थांबलो. खर तर आज दिवाळी. एकीकडे अंबटेप पासून
हाकेच्या अंतरावर असलेली सहारा सिटी लाख लाख दिव्यांच्या रोषणाईने झगमगत होती. तर
इथे साध्या विचेच्या सोयी पासून अद्याप वंचित असलेला हा धनगर वाडा मात्र दोन सौर
दिव्यांच्या धूसर उजेडात आपली दैनंदिन कामे आटोपत होता. केव्हडा हा विरोधाभास!
दिवाळी निमित्त भिंतीच्या कोनाड्यात तेवेत
होती ती ही एकुलती एक पणती !!
0 comments:
Post a Comment