Social Icons

Pages

Monday, November 21, 2016

चमचमत्या लाटा

नेमक कधी आठवत नाही. मी तिसरी चौथीत असेन कदाचीत. आम्ही गणपती पुळ्याला गेलो होतो. रात्री जेवणं उरकल्यावर सहज समुद्रावर फेरफटका मारायला बाहेर पडलो. त्याकाळी आठ-साडेआठ वाजले की समुद्रकिनारे ओस पडत असतं. आत्ता सारखं बीच साईड कॅम्पिंग वगैरेच फॅड तेव्हा नव्हतं. स्ट्रीट लाईट वगैरेचे चोरटे प्रकाशझोत तर सोडाच पण आकाशात चंद्राचाही पत्ता नसल्याने संपूर्ण किनाऱ्यावर काळ्या मिट्ट अंधारच साम्राज्य पसरलं होत. अंधारात अंदाजे चाचपडत आम्ही मंदिराच्या शिजराच्या गल्लीतून समुद्र किनाऱ्यावर दाखल झालो. निर्मनुष्य किनाऱ्यावर मात्र निसर्गाने एक वेगळाच खेळ मांडला होता. समोर जे दिसतंय ते नेमकं काय हे समजत नव्हतं. किनाऱ्याकडे झेपावणारी प्रत्येक लाट उलटताना रेडियम सारखी झगमगत होती. त्या काळ्या कुट्ट रात्रीत त्या चमकत्या लाटांमुळे संपूर्ण किनारपट्टी झळाळून निघाली होती. एका पाठोपाठ एक चमचमत्या लाटा किनाऱ्याकडे झेपावत होत्या.
चंद्राचे किरण परावर्तीत होतायत म्हणायचे तर आकाशात चंद्रही हजार नव्हता. लाटा नेमक्या कशामुळे चमकत आहेत हे काही तेव्हा उमगले नव्हते पण तो निसर्गाचा चमत्कार पाहत आम्ही बराच वेळ समुद्रावर रेंगाळलो. समुद्रा वरच्या गार वाऱ्यावर हा चमचमणारा समुद्र पाहत बाबांच्या मांडीवर केव्हा झोप लागली कळलेच नाही. झोपेमुळे चमचमणाऱ्या लाटा नजरे आड गेल्या पण ह्या रहस्या बद्दलच कुतूहल अनुत्तरीतच राहिलं.
कधी कधी नकळत पडलेल्या प्रश्नाची अगदी अनपेक्षित पणे उकल होते तशी ह्या चमकणाऱ्या लाटांचे रहस्य पुढे University चा Taxonomy चा कोर्स केला तेव्हा उलगडले.  पण पुन्हा कधी असा अनुभव घेता आला नव्हता.
गेल्या वर्षीच्या जुहू बीच वरील Bioluminescence च्या रिपोर्ट मुळे ह्या आठवणींन उजाळा मिळाला.  या वर्षी राजस आणी सारंग ने सोबत केल्यामुळे आमच्या मुंबईत याची देही याची डोळा हा चमत्कार पुन्हा एकदा अनुभवता आला. मात्र इथे मुंबईच्या झगमगाटा पुढे ह्या planktons चा Bioluminescence पार फिका पडला. कैक वर्षांपूर्वी गणपती पुळ्याच्या सागर किनारी पाहिलेल्या चमकत्या लाटांच्या झगमगाटने दिपलेल्या डोळ्यांना इथला फिक्या तेजाने काही फारसा दिलासा मिळाला नाही हेही तितकेच खरे.

P. C. : Rajas Deshpande


Bioluminescence बद्दल अधिक माहिती साठी आमच्या एका मित्राने लिहिलेला हा ब्लॉग पाहावा.
सौरभ सावंत Blog : http://saurabhsawant.in/2016/11/19/facts-bioluminescence-juhu-mumbai/ 

0 comments:

Post a Comment

 
 
Blogger Templates