Social Icons

Pages

Thursday, March 26, 2015

घाटवाटांचे पझल भाग २

शनिवारी अर्ध्या दिवसाची कल्टी मारुन दिवसा उजेडीच धामणहोळ गाठायचा प्लॅन होता. आदल्या खेपेला प्रचंड उष्म्याने झालेले हाल लक्षात घेता उन्हाळी ट्रेकच्या दृष्टीने माणशी निदान पाच लिटर पाणी सॅकमध्ये कोंबले. पवनला भरपूर ताकदही घ्यायच्या सूचना दिल्या. राजसने जलजीराचा स्टॉक घेतला. माझी सॅक, शूजरोप आणि इतर इक्विपमेंट लोड करून गाडी राजसच्या सुपूर्द केली. पण जैसे योजिले तसे घडावे तर तो ट्रेक कसला. राजस काही कामात अडकला आणि निघे निघेस्तोवर पाच वाजले. त्यात अवेळीच पावसाने हजेरी लावली. सगळं सुमंगल घडत होते. ना विंडचिटर घेतलेलं ना सामान प्लास्टिकमध्ये बांधलेलं. खंडाळा घाटात पोहोचलो आणि दुपारीच धामणहोळ गाठलेल्या चमूचा फोन आला, इथे रिमझिम पाऊस पडतोय आणि भरीस भर म्हणून गावकरी देव घाटाला सोडायचे सव्वा तीन हजार रुपये सांगत आहेत.

सव्वा तीन मी बसल्या जागीच उडाले.

काय करतेयस येतेयस की मागे फिरतेय. पलिकडून विचारणा झाली.

मागे फिरण्याचा प्रश्नच येत नाही. वाटाड्याचं उद्या पाहू सकाळी, कोणी नाही आल तर घुसू आपणच आणि पावसाच काय एवढं. पावसाळ्यात तरी काय आपण घरी बसतोय होय. होऊन जाऊ देत अवेळी मान्सून ट्रेक.

रात्री ११ वाजता गाडी गावात शिरली तेव्हा गाव चिडीचूप निजले होते. काळे दादांच्या व-हांड्यात सगळ्यांनी ताणून दिली. रात्रभर अखंड पाऊस कोसळत होता. सकाळचा पाच-साडेपाच-सहा-साडेसहाचा अलार्म बंद करत आम्ही निपचित पडून राहिलो. उठून करणार तरी काय होतो. आभाळ फाटल्यासारखा पाऊस कोसळत होता आणि सगळीकडे काळ्या मिट्ट अंधाराचं साम्राज्य होतं. अखेर सात वाजता जरा पावसाचा जोर कमी झाला. आम्ही पटापट आवारावर केली. दिनकर मामा अचानक आजारी पडले होते. गावातील इतर कोणालाही देव घाट अचूक माहीतच नव्हता. त्यात पावसामुळे रानात शिरायला कोणीच तयार होईनात. आता काय करावे विचार करत उभे होते एवढ्यात शंकरदादा समोर आले.

दादाबघाना कोणीच यायला तयार नाहीये. तुम्ही तरी चलानुसतं वाटेला लावून द्या, पुढे जाऊ आमचे आम्ही. आम्ही दादांना गळच घातली.

पण शंकरदादा देवघाटाने कधीच गेलेले नसल्यामुळे त्यांनी चौ-यापर्यंत सोडायचं कबूल केल्यावर आम्ही जास्ती ताणलं नाही. आलोच म्हणत दादा गावात गेले. पाच मिनिटांनी कुठूनशी दहा-बारा कुत्री आणि तीन-चार पोर बरोबर घेऊन दादा हजर. आता रानात जायचं म्हणजे कुत्री हवीतच आणि परतीला सोबतपण होईल या पोरांची. वाटेवर कुठं काय जनावर असंलरानात धोका असंल तर ही कुत्री आवाज करतील. असुदेत बरोबर  दादांच्या या लॉजिकवर काही न बोलता अखेरीस सव्वा आठ वाजता आमचा हा सारा ‘शाही’ लवाजमा देवघाटाकडे निघाला.

निसणी, लिंग्या घाट डावीकडे ठेवत आम्ही उजवीकडची डोंगररांग चढू लागलो. गावापासून १५ मिनिटे सरळ चालून मग एक टेकडी चढून पलीकडे पोहोचलो. वाट जुनी असली तरी कारवीचे रान माजले होते. शंकरदा कोयतीने कारवी छाटत चालाण्या पुरती वाट मोकळी करत होते. गावातून सोबत निघालेली श्वानगँग आणि दोन पोर वाट वाकडी करून कधी निसटली कळलंच नाही. उरले ते शंकरदा आणि त्यांचा राजामारुतीदादा आणि त्यांचा काळू. दोन्ही कुत्री पुढे पुढे धावून वाटेत काही धोका नसल्याची खात्री करत होती. मालकाने एक हाक दिली की परत शेजारी हजर. मालक थांबला की हे पण त्याच्या शेजारी येऊन बसत. ह्यांच्या इमानाला तोड नाही खरच.

टेकडी ओलांडून कड्यापाशी आलो. कारवीची जाळी जरा मोकळी केली तेव्हा लक्षात आलं आम्ही लिंग्या घाटातील नैसर्गिक गुहेच्या माथ्यावर उभे होतो. समोर लिंग्या घाटातून दिसलेली दरी पसरली होती. त्यापलीकडे उजवीकडे दूरवर उंबर्डी गाव आणि नाकासमोर कुर्डूगडाचा सुळका. त्यापलीकडे थिबथिब्या ते माजुर्णे पर्यंतची सह्याद्रीची रांग ढगांशी लपंडाव खेळत होती.

देव घाटाच्या वाटेवरून दिसणारा कुर्डूगड 
घाटावरची बोचरी हवा अंगावर शहारे आणत होती. त्यातच अधूनमधून येणा-या सरींमुळे चांगलेच भिजायला झाले होते आणि अधिकच थंडी वाजत होती. आणखी एका टेकडीच्या पायथ्याशी फेरा घालत आम्ही एका घळीत पोहोचलो. चालता चालता मारुतीदादांशी गप्पा रंगू लागल्या. एक मुलगी अशी दूरवर डोंगरवाटा तुडवत इथवर येते ह्याचं त्यांना विलक्षण कौतुक वाटत होतं. प्रत्येक टप्प्यावर मी व्यवस्थित पोहोचतेय की नाही ह्याकडे त्यांच नीट लक्ष होतं. त्यांना जंगलाची बरीच चांगली माहीती दिसत होती. त्यांच्याकडून दीपाच्या वनाची माहिती मिळाली आणि पुन्हा एकदा धामणहोळला येणे होणार हे निश्चित झाले.

गावापासून साधारण तासभराच अंतर कापल्यावर आम्ही एका खिंडीपाशी पोहोचलो. डावीकडे एक मोठी वाट उतरत होती. ही वाटदेखील कारवीत बुडालेली. समोर दिसणाºया खिंडीच्या डावीकडे डोंगर माथ्यावर भलमोठ सपाट गवताळ मैदान दिसत होतं. गावकरी याला दुर्गाडी म्हणतात. मैदानावर गुरांना चरण्यासाठी आणल जातत्यामुळे इथवरची वाट जरा तरी शाबूत आहे.

देव घाट पहिला टप्पा सुरुवात 
हा बघा मॅडम देवघाट हितनचं सुरु होतो. शंकरादादांनी डावीकडे वळण्याचा इशारा केला. दादा पुढे होऊन कोयत्याने फांद्या छाटत वाट मोकळी करत होते. पाचच मिनिटात वाट पुन्हा झाडांच्या दाट जाळीशी येऊन लुप्त झाली. एवढी मोठी झाड तोडत जाण्यापेक्षा बाजूच्या पाण्याच्या मार्गाने उतरणे अधिक रास्त होते. मारुती दादा सांगू लागले, इथून चौºयापर्यंत चांगल्या घडीव दगडी पाय-या बांधलेल्या होत्या. पण वापर नसल्यामुळे ३०-४० वर्षात जंगलाने सगळ्याचा ताबा घेतलाय.

आता पावसाने चांगलाच जोर धरला होता. रात्रभर झालेल्या पावसामुळे निसरड्या झालेल्या दगडावर कसाबसा तोल सांभाळतझाडांच्या फांद्या चुकवत आम्ही उतरू लागलो. ओल्या दगडावर बिलकुल ग्रीप न देणारे माझे वैनब्रेनर शूज सारखे घसरत होते. एकंदर वेग फारच मंदावला होता.

थोड्या थोड्या अंतरावर दादा उजवीकडे जंगलात घुसून पायवाट शोधत होते. आम्हाला दुर्गाडीच्या डोंगराला वळसा घालून पदरातील गवताळ मैदानावर पोहचायचे होते. ह्याच टप्प्यावर पाण्याची दोन टाकी खोदलेली आहेत. मैदान साधारण चौकोनी आकाराचे असल्यामुळे ह्याला चौºया म्हणत असावेत बहुतेक. साधारण अर्धा तास नळीतून घसरपट्टी करून अखेर आम्ही पायवाटेला लागलो. घनदाट जंगलातून चालताना उजवीकडे दुर्गाडीचा कडा आणि डावीकडे लिंग्या घाटातून दिसलेली दरी असा आमचा प्रवास सुरु झाला. एके ठिकाणी रान मोकळे झाले आणि आम्ही दरीच्या तोंडाशी पोहोचलो. 
देव घाट : लिंग्या घाट यांच्या माधीन दरी 

समोर कुर्डू गडाचा सुळकाडावीकडे लिंग्या घाटाची घळ आणि मध्ये दरीअसा नयनरम्य नजारा दिलखुश करून गेला. दरी डावीकडे ठेऊन चिंचोळ्या वाटेने पुढे होत आम्ही दहा मिनिटात चौ-यावर पोहोचलो.

मागच्याच रविवारी समोर लिंग्या घाटाच्या कड्यापाशी बसून ह्या मैदानाकडे पाहताना इथे कसं पोहोचता येईल ह्याचा विचार करताना वाटलं नव्हतं इतक्या लवकर येथे पोहचू म्हणून. संपूर्ण पठारावर सोन पिवळ गवत उगवलेलं आणि लागवड केल्यागत एका रांगेत असलेली ऐनाची निष्पर्ण झाडं दिमाखात डोलत होती. पाण्याच्या टाक्यापाशी मंडळी जरा विसावली. 
चौऱ्या वरील पाण्याची टाकी
शंकरदादा आणि मारुतीदाद पठाराच्या टोकाशी जाऊन खाली घळीकडे उंगली निर्देश करत काहीतरी गहन चर्चा करण्यात गढून गेले होतेआणि त्यांचे इमानी सवंगडी जस काही सगळं उमजत असाव अशा अविर्भावात ऐकत होते. 


मारुतीदादांनी आम्हाला येथूनच उजवीकडच्या घळीतून उतरणारी वाट समजावून दिली. एकदा कोकणात उतरलात की ओढ्याच्या बाजूने चालत गेलात म्हणजे तासाभरात उंबर्डीत पोहोचाल इति मारुतीदादा.

उंबर्डी तसं बरंच लांब दिसत होत. त्यात घाट वाट कशी असेलउतरायला किती वेळ लागेल ह्याचा काहीच अंदाज बांधता येत नव्हता. मारुतीदादांकडून लिंग्याघाट कुठून चढतो ते समजावून घेतले. उंबर्डीत जाण्यापेक्षा लिंग्या घाटाने पदरात पोहोचून कुर्डूगड पेठ गाठणे जास्त रास्त वाटत होते.

शंकरदादांना इथून पुढच्या वाटेची जराही कल्पना नव्हती. एकटेच आले असते तर कदाचित आम्हाला इथवर सोडून ते परत गेले असते. पण कोयता हाती घेऊन मारुतीदादा पुढे झाले. जंगल इतकं दाटत्यात काळवंडलेल आभाळजणूकाही संधीप्रकाशातच वाटचाल करत होतो. वाट अजिबातच नाहीमोठ्या मोठ्या वेलींची जाळी जमिनीपर्यंत गुंतत गेलेली. आधाराला फांदी धरावी तर बोटात काटे रुतत होते. वेली फांद्यांच्या जाळीतून कसेबसे घसपटत साधारण १५ मिनिटात आम्ही एका घळीच्या तोंडाशी येऊन पोहोचलो. समोरच्या पदरावर चौºया सारखेच गवताळ मैदान दिसत होते. घळीच्या तोंडाशी रचून ठेवलेल्या दगडांवरून लगेच लक्षात आलं की, ही देवाघाटाच्या दुसºया टप्प्याची सुरुवात असणार. पाऊस थांबण्याचे काही चिन्ह दिसत नव्हते.

मारुतीदादा डावीकडे हात करत घळ न सोडता नाकासमोर उतरण्याची सूचना करत म्हणाले, अजिबात डाव उजवं घुसायच नाही. आम्ही इथनं मागे फिरतो. पुढची वाट आम्हाला माहित नाही. कोकणातील लोक हितन गुर घेऊन यायचे तेवढंच ऐकिवात आहे....

शंकरदादांनी जबाबदारी संपल्याचं सांगत सांभाळून जायला सांगत, वाट गावली नाही तर गुमान माग फिरुन गावात येण्याची दटावणी गेली.

देव घाट दुसरा टप्पा सुरुवात
दुपारचे १२ वाजून गेले होतेआता पावसाचा जोर वाढू लागला. आम्ही पटापट उतरायला सुरुवात केली. दगडाने आच्छादलेल्या नागमोडी वाटेवर मोठ मोठे वृक्ष कब्जा करून बसले होते. दहा मिनिटे उतरत वाट सरळ पुढे बाजूच्या घळीत शिरली. जंगलाच्या जाळीतून बाहेर पडून मोकळ्यात आलो आणि पठारावरून मामांची हाक ऐकू आली. मागे फिरा वरच्या घळीतून उतारा ह्या घळीत टप्पे आहेत.

धन्य ते मारुतीदादा. किती काळजी करावी आमची. आणखी बराचवेळ मारुतीदादा ओ देत राहिले. घळीत आमचा आवाज जसजसा आणखी खोल जाऊ लागला तसे ते दोघे गावाकडे निघाले.

जरा खाली उतरताच वेलींच्या जाळीने वाट अडवली. त्यात घुसणे अशक्यच होते. बाजूनेच वाहणाºया पाण्याच्या वाटेला लागण्याशिवाय पर्याय नव्हता. मोठ मोठे खडक उतरत पुढचा प्रवास सुरु झाला. पाऊस थांबायचे चिन्ह नसल्याने उभ्या उभ्याच नाचणी चिप्स आणि ताक ढकलून भुकेल्या पोटाला जरा आधार दिला. पाठीवरच्या सॅकमध्ये पाच लिटर पाणी होते आणि त्यातले अजून घोटभरदेखील वापरले नव्हते. वातावरणातल्या गारव्यामुळे तहान अशी लागलीच नव्हती. दगडावरून वाहणारे गार पाणी तोंडाचा चंबू करून गटकण्यातली मजा काही औरच होती. तासाभरात आम्ही कोकणात उतरलो. उंबर्डी गाठायचे म्हणजे तासाभराची चाल होती. तो विचार सोडून सरळ लिंग्या घाटाने पदरात पोहोचायचे ठरले. पण त्याआधी ओहोळाच्या शेजारी एक सपाट दगड हेरून पोटोबा शांत करून घेतला.

गावच्या वाटाड्याची जागा प्रसादने घेतली. आमचा खाणं उरकायच्या आत हा जंगलातून ओरडत आला वाट मिळालीये. खरतर वाट नव्हती मिळालीपण कोळी राजाच्या वाड्याचे जोते मिळाले होते. रात्री गावक-यांशी झालेल्या देवघाटाबद्दलच्या गप्पांमध्ये घाटाच्या सुरुवातीला कोकणात कोळी राजाच्या वाड्याचे अवशेष अजूनही पाहायला मिळतील असे कळले होतेत्याचीच पुष्टी झाली होती. लिंग्या घाटाची पायवाट इथूनच कुठूनतरी जात असणार ह्यात शंका नव्हती. 
कोळी राजाच्या वाड्याचे अवशेष

वाड्याचे सगळे अवशेष पाहून डोंगर कडा डावीकडे ठेवतदगड झुडपाच्या जाळीतून आम्ही चढायला सुरुवात केली. नेहेमीप्रमाणे प्रसाद सगळ्यात पुढे होता. वाटेत येणाºया वेली-फांद्या  साफ करत त्याची चढाई फारच धीम्या गतीने होत होती. मला अश्या मुंगीच्या वेनागे पुढे सरकायचा कंटाळा आलेला. एक दोनदा त्याला ओरडले की नको करूस वाट मोकळी आम्ही येतो कसेही. पण त्याने त्याकडे सपशेल दुर्लक्ष केले. अखेर वैतागून मी आपली स्वत:ची वाट काढत झपाझप पुढे गेलेयज्ञेश आधीच डावीकडून वर चढून आला होता. थोडा आणखी चढलो आणि अखेर स्पष्ट पायवाटेला लागलो.

हाच तो लिंग्या घाटधामणहोळ ते उंबर्डी अशी ये-जा सतत सुरु असल्यामुळे वाट चांगली मळलेली आहे. रस्त्यात खुणेसाठी दगडांवर तसेच झाडांवर पांढºया रंगाने वर्तुळं काढलेले आहेत. दुपारचे सव्वादोन वाजले होते. इथून पदरात पोहोचून कुर्डूपेठ गाठून चीपेच्या दाराने चढून जाण्यासाठी पुरेसा वेळ हातात होता. तसाच विचार करून पटापट चढायला लागलो.

निशाणीच्या वाटेवरून दिसणारा देव घाट 
पदरात पोहोचतोय ना पोहोचतोय तोच संपूर्ण परिसर धुक्यात गडप झाला. आकाशात काळ्या ढगांनी गर्दी केली आणि पावसाला सुरुवात झाली. तीनच वाजले होते पण नवी वाट चढायची आणि सभोवतालचा परिसरच पाहता येणार नसेल तर काही अर्थच नाही ना. नाईलाजाने चीपेच्या दाराचा विचार सोडून दिला आणि आम्ही निसणीच्या वाटेला लागलो. वाघजाईच्या ठाण्याशी पोहोचलो तेव्हा साडेतीन पावणे चार वाजले असावेत. छत्रीत जाऊन विसावलो आणि दहाच मिनिटात सगळ धुकं विरून गेलं. काळे मेघ वा-यासोबत पुढे निघून जाऊ लागले. आजूबाजूचा सगळा परिसर सायंकाळच्या सोनपिवळ्या प्रकाशात उजळून निघाला होता. निसर्गाने चांगलीच थट्टा केली होती आमची. समोर चीपेचं दार खुणावत होतंपण आता पुरेसा वेळ शिल्लक नव्हता. डोंगराकडे पाहत मनातल्या मनातच म्हटलं, राहिलं मित्रा या खेपेला पण येऊ लवकरच तुला भेटायला. पवनने त्याच्या पोर्टेबल स्टोव्हवर गरमागरम सूप बनवून दिलं. दिवसभर भिजल्यामुळे भरलेली हुडहुडी कमी व्हायला जरा मदत झाली.

पुन्हा एकदा खादाडी उरकून आम्ही गावाकडे निघालो. वाटेत जुन्या मंदिरापाठची दगडी विहीर पाहून आम्ही गावात पोहोचलो. आमचे दोन्ही वाटाडे आमच्या वाटेकडे डोळे लाऊन बसले होते. शंकर दादांनी चहा घेतल्याशिवाय जाल तर बघा अशी तंबीच दिल्यामुळे कपडे बदलून सॅका आवरून आम्ही दादांच्या घरी गेलो. चहा घेताघेता पुन्हा एकदा घाट वाटेची माहिती तपशीलवार लिहून घेतली.

गप्पा मारताना शंकरदादानी पुढच्या खेपेला चीपनं उतरू आणि दीपानं वर येउ असा कर्जत कसारासारखा भलामोठा क्रॉसकंट्री तंगडतोड ट्रेकचा प्लान मांडला. दोन वेळा आडवाटा धुंडाळून सुखरुप परत आल्यामुळे बहुदा आमच्या स्टॅमिन्यावर शंकरदादांना भलताच कॉन्फिडन्स आलेला दिसत होता. पोर चालत्यात तर ब्येस फिरवू शकतो ह्यांना!!!

पुन्हा यायचा वायदा करत जड अंत:करणाने गावक-यांना निरोप दिला. गाव सोडला तेव्हा पावसाची रिमझिम सुरु झालेली. लोणावळा-खंडाळा घाटात पावसाने अक्षरश: झोडपून काढले. घरी पोहोचायला रात्रीचा एक वाजला. आंघोळ करून सुईने हातात रुतलेले काटे काढायला बसले. एकदोनतीनचार ... मोजणेच सोडून दिले. एवढी भटकंती केली सह्याद्रीतपण घाटवाटेवर एव्हढं दाट जंगलं वाढल्याचं पाहीलं नव्हतं. मारुतीदादा नसते आले तर वाट सापडण जवळजवळ अशक्यचं होतं. चीपेचं दार राहीलं असलं तरी लिंग्या घाट पूर्ण झाला होती. त्याहूनही अधिक समाधान म्हणजे अखेर आठवडाभर डोक्याला मुंग्या आणणा-या प्रश्नाची उकल झाली होती.

मात्र आम्ही केलेली भटकंती आणि नोंदी पडताळून पाहणे गरजेचे होते. त्यासाठी डोंगरयात्रेतील गुरु आनंद पाळंदे सरांशी बोलून त्यांना ब्लॉग पाठवून दिला. त्यांनी देखील आत्मीयतेने सारे तपशील वाचले आणि एकेदिवशी त्यांचा फोन आला. आमच्या तपशीलवार नोंदीचे कौतुक केले आणि देवघाटाच्या आमच्या भटकंतीमुळे त्यांच्या नोंदीत भर पडल्याचे सांगितले. हा खरा आनंदचा क्षण होता.

सह्याद्रीत आता नवीन भटकण्यासारखे, नोंदविण्यासारखे काहीच नाही असे एक पालुपद गेली अनेक वर्षे अनेकवेळा अनेकांकडून ऐकायला मिळाले होते. मात्र आमचा छोटासा चमू गेली सात आठ वर्षे ठरवून आडवाटांवरच भटकत होता. गावक-यांच्या बोलण्यात नवे संदर्भ मिळायचे, कधी ते पडताळून पाहता यायचे कधी काहीच माग लागायचा नाही. धामणओहोळात मात्र देवघाटाने आम्हाला अशाच एक विस्मृतीत गेलेल्या वाटेवर आणले. अनेक वर्षे वावर नसलेल्या वाटेवर मनसोक्त भटकता आले. पाण्याची टाकी, कोळी राजाच्या वाड्याचे चौथरे अशा खुणांनी घाट राबता असल्याचे दाखवून दिले. आणि सह्याद्रीतदेखील अजून शोधायला भरपूर वाव आहे याची प्रचीती आली.

डोंगरात भटकायचे कशासाठी, आनंदासाठी तर नक्कीच. पण नव्याची आस ठेऊन असे काही मिळालच तर तोच आनंद शतगुणित झाला अस म्हणायला काहीच हरकत नाही. 

Photo courtesy : Prasad Tandale

घाटवाटांचे पझल भाग १


कुर्डु गड ते देव घाट 

धामणहोळ गावाची शेत पार करत अवघ्या २० मिनिटात आम्ही घाट कड्यावरील सवाष्णीच्या ठाण्यापाशी पोहोचलो. खालच्या वाटेकडे बोट दाखवत दादा म्हणाले, ह्या इथन जावा बघा, खालच्या पदरातून डावीकडे वळलात की तासाभरात कुर्डु पेठेत पोचाल. दादांनी आम्हाला वाट दाखवली, पण आम्हाला दुस-याच वाटेने जायचं होतं.
सवाष्णीच ठाण
दादा, वाघजाई पुढून उतरणारा लिंग्या घाट आहे हा, आम्ही येथून चढून येणार आहोत. आम्हाला देव घाटान उतरायचं आहे. देव घाटाकडे सोडा आम्हाला, मी आमचा मनोदय जाहीर केला.

शंकरदादांच उत्तर तयारच होतं, देव घाट खूप लांब आहे त्या डोंगरापल्याड तिथ जायला अख्खा दिवस लागेल.तरीदेखील, तुम्ही फक्त वाटेला लाऊन द्या आम्ही आमचे आम्ही जातो, असे म्हणत आम्ही आमचं घोड पुढं दामटलं.

आता शंकरदादांना पर्यायच नव्हता. आम्हाला बिगी बिगी चलायला सांगून आल्या वाटेने माघारी फिरत शंकरदा डावीकडे कारवीच्या जाळीत घुसले. १० मिनिटं कारवीचे ओरखडे सहन करत पाण्याच्या वाटेने  मंद उतरत आम्ही एका घळीच्या तोंडाशी पोहोचलो.
घळीच्या तोंडाशीच मधोमध एक सुळका दिमाखात उभा ठाकला होता त्याकडे पाहत दादांनी सांगीतले, ह्यो आमचा देव, हितनं उतरुन जा, सुळक्याच्या पाठीमागून उतरते वाट. कोनबी जात नाही आता या वाटनं. दरड कोसळून वाट मोडलीय. बघा तुमाला मिळते का ते. सांभाळून जा, वाट नाही गावली तर माघारी या गावात. वाटेबद्दल अधिक माहिती देऊन दादा माघारी फिरले. जाता जाता दादांनी पुन्हा एकदा देवाला (सुळक्याला) दंडवत घातला.
लिंग देव : लिंगोबा : लिंग्या घाट 

आम्ही वाटेकडे वळलो. वाट मोडली आहे अस दादा म्हणाले तरी बरीच मळलेली होती. नाणेघाटात गुहेपासून खाली काही अंतर नागमोडी वळणाची दगडी वाट आहे अगदी तशीच हीदेखील. तीन-चार वळणं घेऊन सुळक्याच्या पायथ्याशी पोहचलो. २०-२५ फूटांचा हा सुळका वाटेतच मध्येच असकाही दिमाखात उभा होता, जणू काही येणाºया जाणा-यांवर नजर ठेवण्यासाठीच. घाटाला देवघाट हे नाव या सुळक्यामुळेच पडले असावे बहुदा, असा विचार करत पुढे उतरू लागलो तर समोरच आणखीन एक आश्चर्य आमची वाट पाहत होतं. उजवीकडच्या डोंगराच्या पोटात एक विशाल नैसर्गिक गुहा आढळली. डोंगर कड्यावरून कोसळणा-या प्रपाताच्ये हे प्रताप. अतिशीतल, शांत अशी आणि ५०-६० माणसं सहज सामावून घेणारी ती विस्तीर्ण गुहा म्हणजे निसर्गाची किमयाच म्हणावी लागेल. आपसूकच कानदाट खो-यातील देवडोहाची आठवण झाली आणि पावसाळ्यात वरुन कोसळणा-या विशाल धबधब्याचं दृश्य मनातल्या मनात रेखाटलं गेलं. अश्या निसर्गरम्य घळींची निवड पूर्वी ऋषीमुनी तपश्चर्येसाठी का करत असावेत ह्याची प्रचीती न यावी तर नवलच.

नैसर्गिक गुहा
प्रसाद आणि सागर गुहेच्या मऊ मातीत उमटलेल्या पाऊल खुणांचा अंदाज बांधण्यात मग्न झाले, तर रोहनने घुहेच्या तोंडाशी असलेल्या एका मोठ्या सपाट दगडावर आडवे होणे पसंत केलं. मनोज फोटोग्राफीत गढून गेला आणि मी गुहेच्या वरच्या अंगाला असलेल्या खोबण्या पाहायला निघून गेले. एका कपारीतून थेंब थेंब अखंड पाणी पाझरत होत. नाश्ता उरकून पुढे निघालो. गुहेच्या तोंडाशी असलेल्या कड्यापाशी पोहोचलो तेव्हा लक्षात आल की पुढे वाट मोडली होती. वाटेवरचे दगड पाण्यासोबत वाहून गेले आहेत. वावर नसल्याने घळीत झाड वाढली आहेत. आणखी दहा मिनिटे उतरलो आणि वाट पुरती मोडलीच.

आता पुढची उतराई पाण्याच्या वाटेने सुरु झाली. मोठ मोठाले धोंडे पार करत अखेर आम्ही एका मोठ्या कड्यापाशी पोहोचलो. इथून खाली उतरण शक्यच नव्हतं. कुर्डुगडाकडे जाणारी वाट डावीकडच्या जंगलातून पदरात जाते असा खुलासा शंकरदादांनी केला होता. प्रसाद डावीकडच्या जंगलात घुसला आणि आम्ही कड्याच्या टोकाशी जाऊन बसलो. समोरचा देखावा मंत्रमुग्ध करून सोडणारा होता. पाच-सहाशे फूट खोल दरी,  दरी कसली चिंचोली घळच म्हणा की, त्यापलीकडच्या डोंगरातून विलग झालेला एक गवताळलेला पदर आणि त्यावर लागवड केल्यागत समान अंतरावर वाढलेली ऐनाची झाड.

दरीच्या टोकावरून दिसणारे गवताळलेले मैदान

 त्या गवताळ मैदानावर जाता आल तर! विचारासरशी तिथं कस पोहोचता येईल ह्याचा पडताळा घेत कड्याकपा-यांवरुन नजर भिरभिरली. प्रकरण जरा अवघडच होत, पण प्रयत्न करायला काय हरकत आहे या विचारतंद्रीत असताना प्रसादची हाक आली. त्याला पायवाट मिळाली होती. कारवीचा आधार घेत निखळत्या मुरमाड मातीतून वर चढत पाच मिनिटात आम्ही पायवाटेवर थडकलो. विस्तीर्ण पायवाट फक्त कारवीच्या विळख्यात हरवलेली. दहा-पंधरा मिनिटे पुढे गेल्यावर उजवीकडे उबर्डी गाव दिसू लागलं, नाकासमोर झाडामागून कुर्डुगडाचा सुळका डोकावू लागला तर डावीकडच्या पठारावर वाघजाई जवळील छत्री नजरेस पडली. आणखी थोडे पुढे गेलो आणि एका अजस्त्र उंबराच्या झाडापाशी ही वाट वाघजाई कडून येणा-या वाटेला मिळाली. येथे दोन गुळगुळीत गोटे मांडून ठेवले होते. खुणेसाठी ठेवलेल्या अश्या गोट्यांना देव मानून गावकरी येताजाता त्याच्या पाया पडत असतात. 

खुणेसाठी रचून ठेवलेले गोटे
इथून कुर्डुगड फार-फार तर २० मिनिट. प्रसाद यापूर्वी कुर्डूगडाला जाऊन आला असल्यामुळे त्याने खुलासा केला. अगदी दोन मिनिटांच्या चालीवर एक ठळक वाट उजवीकडच्या रानात घुसली आणि शंकरदादांचे शब्द आठवले, उंबरापुढे एक वाट उजवीकडे रानात वळेल ती घेऊ नका, ती उंबर्डी गावात उतरते, सरळ वाट कुर्डू पेठेला जाते. २०-२५ मिनिटात आम्ही कुर्डाई देवीच्या मंदिरापाशी पोहचलो.
 
कुर्डूगड
मंदिरासमोरच्या पायवाटेने गड चढायला सुरुवात केली. दहा मिनिटातच पाण्याच्या टाक्यापाशी पोहोचलो. टाक्याच्या वरच्या अंगाला दगडात कोरलेला भग्नावस्थेतील दरवाजा आणि त्याला जोडून वर चढत जाणा-या काही पाय-या आहेत. इथून एक चिंचोळी पायवाट गडमाची उजवीकडे ठेवत धामाणहोळच्या दिशेने फिरते. ह्या वाटेने गडाच्या हनुमान बुरुजावर प्रवेश होतो. बुरुजावर एक सुबक कोरीवकाम केलेली मारुतीची मूर्ती अशी काही रचून ठेवलेली आहे जणू काही घाटावराची वाघजाई आणि हा मारुती एकमेकांकडे नजर रोखून पाहत असावेत. ह्या मूर्तीचे नाविन्य म्हणजे या मारुतीला मिशी आहे. इथून पुढे गड सुळका डावीकडे ठेवत पुढे गेल की एक मोठं पाण्याचं टाक पाहायला मिळत.

आल्यावाटेन पुन्हा मागे येऊन गड उजवीकडे ठेवत पुढे गेलं की गड सुळक्याच्या पोटात एक भलीमोठी नैसर्गिक गुहा तयार झालेली पाहायला मिळते. गुहेच्या छताच्या सतत पडणारे टोकदार कपचे गुहाभर विखुरले होते. आणि त्याचमुळे निवा-यासाठी ही जागा निरुपयोगीच म्हणायला हवी. तरी सध्या काही ठिकाणी थोडीफार जागा निवा-या पुरती साफसफाई करून सपाट केल्याचे आढळले.

इथून पुढे गडाच्या टोकाला, गड मुख्य सह्याद्री रांगेपासून विलग होतो तेथे एक भक्कम बांधणीचा बुरुज अजूनही सुस्थितीत आहे. स्थानिक ह्यालाच कडेलोटाचा बुरुज म्हणतात. बुरुजाच्या १३ पाय-या चढून एकदा जरूर मधल्या दरीत डोकवावे. उजवीकडे गडाच्या मुख्य सुळक्यापासून सुटून आणखी एक छोटा सुळका उभा ठाकलेला दिसतो. तो सुळका आणि गडाचा मुख्य सुळका यांच्या मधल्या खिंडीवजा खोबणीतून थोडी चढाई करून वर आलं की दगडावर दगड कोसळून त्यांची अशीकाही अजब रचना तयार झालेली पाहायला मिळते जणू काही एक अजस्त्र खिडकीच कोणीतरी बसवली असावी. ह्यालाच स्थानिक लोक कोकण खिडकी म्हणतात. नेढ्यासदृश अशा या खिडकीतून थिबथिब्या घाटापासून पार केली नाळी,  कुंभे घाट ते थेट माजुरणे पर्यंतच्या कोकणात उतरणा-या सह्याधारा पाहावयास मिळतात.
 
कोकण खिडकी 
जेवण उरकून आणि थोडा आराम करून आम्ही गड उतरू लागलो तेव्हा दुपारचे दोन वाजले होते. उतरताना टाक्यावर पाणी भरून घेतलं. आल्यावाटेने पुन्हा उंबराशी पोहोचायला पाउण तास गेला. उष्मा खूपच वाढलेला त्यामुळे पुढची खडी चढाई जीव काढणार होती. जरा वेळ उंबराच्या शीतल छायेत विसावून आम्ही उजवीकडच्या पायवाटेने घाट चढायला सुरुवात केली. वाट चांगलीच मळलेली होती. धामाणहोळहून कोकणात उंबर्डी व कुर्डू पेठेत जाण्यासाठी हा सगळ्यात जवळचा मार्ग असल्यामुळे चांगलाच वावराचा आहे. खडी चढण असल्यामुळे घाटमाथा पटापट नजीक होत होता. मध्येमध्ये दगड रचून पाय-या केल्या आहेत. अवघड वळणावर लाकडाचे वासे लावून वाट रुंद करण्यात आली आहे. १५ मिनिटांच्या चढाईनंतर वाट गर्द राईत शिरते. 


पुढे १५-२० पाय-या चढून वळणा-वळणाचा अखेरचा टप्पा पार करून आम्ही वाघजाईच्या ठाण्यापाशी पोहोचलो तेव्हा दुपारचे साडेतीन-पावणे चार वाजले होते. प्रचंड उष्म्याने चांगलाच घाम काढला होता. पर्यटकांसाठी बांधलेल्या नजीकच्याच छत्रीत जाऊन सगळेच आडवे झालो. चांगली तासभर झोप काढून आम्ही गावाकडे चालू लागलो.

गावात पोहोचलो तेव्हा काळेदादा (ज्यांच्या घराच्या व्हरांड्यात आम्ही रात्री मुक्काम केला होता ते) आणि शंकरदा आमचीच वाट पाहत होते.  काय मग गावली का वाट पदरात पोचायला? कुठवर गेलात?”,  शंकरदादांनी गेल्यागेल्या पहिला प्रश्न विचारला.

आम्ही कुर्डूगड पाहून आलो हे त्यांना पटलेलं दिसत नव्हतं. गावातील आणखी काही मंडळी आमच्या भवती जमू लागलेली. प्रश्नांची सरबत्ती सुरु झाली. कुठं जाऊन आलात? कसे गेलात?

देव घाटानं उतरलो आणि लिंग्या घाटाने वर आलो आम्ही तत्परतेने म्हणालो. आणि जोरात नकारार्थी मान हलवत एकजण म्हणाला, देव घाट, नाय नाय त्यो तर चिक्कार लांब आहे.
हे काय शंकरदादा आले होते की सोडायला... आम्ही आपले देवघाटातच अडकलो होतो.
त्यावर दादांनी हलकेच गौप्यस्फोट केला, लिंगदेवाच्या वाटेल लाऊन दिलं आणि निसणीनं आल्येत ते वर...

गुगल अर्थ सुरु केल्यावर स्क्रीनवर गरगर फिरणाºया पृथ्वी गोलाप्रमाणे या दोन्ही वाटा माझ्या डोक्यात गरगर फिरु लागल्या. हा सगळा काय गोंधळ आहे काही कळेनासं झालं. आता हे काय आणखीनच नवीन म्हणत सगळेच एकमेकाकडे प्रश्नार्थक नजरेने पाहत राहिले. पाठीवरच्या सॅका बाजूला आपटून आम्ही घोळक्यात शिरलो. दादा काय ते नीट समजवा. वाघजाई देवीकडून उतरते तीच लिंग्या घाट ना?

नाय नाय ती झाली निसणीची वाट. आणि सकाळी जेथून तुम्ही उतरलात तो झाला लिंग देवाचा घाट. लिंगोबा आहे ना तिथे म्हणून त्याला लिंग्या घाट म्हणत्यात. आधी त्योच घाट वापरात होता. हे टॉवरच काम केलं तेव्हा निसणीची वाट सोपी करून घेतली, सामान वाहतुकीसाठी. त्योच जवळ पडतोय म्हणून आता तिथूनच ये-जा होते. वापर नाही म्हणून लिंग्याघाटात जंगल माजलंय. इति शंकरदादा.

मग देव घाटाच काय? तो कुठे आहे?

आतामात्र काळे दादांच्या मागे बसलेल्या वयाने पोक्त दिसणाºया दिनकर मामांनी पहिल्यांदाच तोंड उघडलं. देव घाट त्या (उजवीकडे हातवारे करत) डोंगराच्या पलीकडे आहे. खूप लांब चालत जाव लागतंय. कोणबी जात न्हाय बगा आता तिथं. पूर्वी पायºया होत्या. गुरांचा वावर होता. कोकणातील मानस चौर्यावर, दुर्गाडीला गुर घेऊन यायची चरायला. आता गुरच नाही राहिलीत कोणाकडे. हितन तर कधी कोणी गेलाच नाही खाली. पण मला माहित आहेत वाट कुठं आहे ते. सात-आठ वर्षांपूर्वी चौºयावर टाकी साफ करायला गेलो होतो आम्ही.

टाकी? पाण्याची टाकी आहेत वाटेवर? हे सार ऐकून आम्हाला वेडच लागायचं बाकी होतं.

चौ-यावर टाकी आहेत पाण्याची. पुढच्यावेळी या, घेऊन जातो तुमास्नी, असे म्हणत त्या पोक्त माणसानं आमच्या डोक्यात विचारांचा भुंगा सोडला. गावक-यांचा निरोप घेऊन परतीला लागलो तेव्हा डोक्यात लिंग्या, निसणी आणि देव घाटाच कोड रुंजी घालत होत. त्यात आणखी एका नव्या नावाची भर पडली ती म्हणजे चीपेच दार.

कधी एकदा घरी पोहोचतेय आणि ह्या कोड्याची उकल करतेय अस होऊन गेलेलं.
सोमवारचा अख्खा दिवस नकाशे, संदर्भ पुस्तकं, गुगलअर्थ, विकीमॅपिया, तसेच आधी या भागात भटकलेल्यांचे ब्लॉग वाचण्यात गेला. गावक-यांकडून मिळालेल्या माहितीस पूरक असा फक्त एक टॅग मिळाला विकीमॅपियावर. कोणीतरी सुळका टॅग केलेला लिंग्या घाटातला. एका संदर्भ पुस्तकातील नकाशात वाघजाई जवळ देव घाट दाखवला होता आणि तसाच टॅग गुगलअर्थ वरही पाहायला मिळाला. बहुदा हाच नकाशात पाहून हा टॅग केला गेला असावा. माझं सह्यभ्रमंतीच बायबल म्हणजे पाळंदे सरांच डोंगरयात्रा’. त्यात निसणी/देव अशी नोंद होती, आणि नकाशात दोन्ही घाटांचा पत्ता नव्हता. ह्यातून नेमका काय बोध घायचा हे कळेना. हे दोन्ही घाट एकच असावेत का? तसे असले तरी नेमका लिंग्या घाट कोणता आणि निसणीची वाट कोणती?

लॉजिकल विचार केला तर गावक-च्या बोलण्यात तथ्य दिसते. घाटाच्या मुखाशी असलेला सुळका, त्याला लिंगी संबोधले जाते. त्याच घाटावर लक्ष ठेवाणार लिंगदेव/लिंगोबा झाला. आणि ह्याच लिंगोबाच्या अस्तित्वामुळे ह्या घाटाचे नाव लिंग्याघाट पडले असावे. इतर काही ब्लॉग आणि ट्रॅव्हलॉगमध्ये (जिथे निसणीच्या वाटेला लिंग्या संबोधले आहे). घाटाला लिंग्या नामकरणामागे येथून कुर्डूगड लिंगीसारखा दिसतो म्हणून लिंग्या घाट असा उल्लेख आढळला.

वास्तविक पाहता, सुळका असलेला घाट जर लिंग्या घाट असेल तर ही वाट दोन डोंगरांच्या घळीतून डावीकडे उतरत पदरात शिरते. घळीतून उतरताना कुर्डूगड दिसतच नाही. कुर्डूगडाचे दर्शन थेट पदरात घुसल्यावर होते. इतर वाटांशी तुलना केली तर असं लक्षात येत की निसणी हे नाव जराशा अवघड श्रेणीच्या, अशा वाटांवर जिथे अवघड टप्प्यांवर बांबू, वासे लावण्यात आले आहेत, अथवा चिंचोळी वाट थेट डोंगर धारेवरून काढली असेल तर वापरले जाते. वाघजाई जवळील वाट ह्याच प्रकारात मोडते. त्यामुळे तिला निसणी हेच नाव अधिक साजेसे वाटत. तस गृहीत धरल तरी मग देव घाटाच काय हा प्रश्न कायमच राहतो.

ह्या सगळ्या प्रश्नाची उत्तरं देव घाटाच अस्तित्व पडताळूनच मिळू शकणार होती.

हे कोड सोडवल्याशिवाय डोक शांत होणार नव्हत, मग पुढच्याच रविवारी पुन्हा एकदा धामणहोळ गाठून देवघाट-चीपेचं दार अशी भ्रमंतीची मोहीम आखली. देव घाटात पाण्याची टाकी आहेत हे कळल्यापासून हा घाट पाहण्याचे वेध लागले होते. कोकण आणि घाटाला जोडणाºया मुख्य वाटांवर अशी पाण्याची टाकी खोदलेली आढळतात. घाटात पाण्याची टाकी असं म्हणजे घाट कधीकाळी  चांगलाच वावराचा असणार यात शंकाच नाही.

घाटवाटांचे पझल भाग २ CLICK HERE




 
 
Blogger Templates