| कुर्डु गड ते देव घाट |
धामणहोळ
गावाची शेत पार करत अवघ्या २० मिनिटात आम्ही घाट कड्यावरील सवाष्णीच्या ठाण्यापाशी
पोहोचलो. खालच्या वाटेकडे बोट दाखवत दादा म्हणाले, “ह्या इथन जावा बघा, खालच्या
पदरातून डावीकडे वळलात की तासाभरात कुर्डु पेठेत पोचाल.” दादांनी आम्हाला वाट दाखवली, पण आम्हाला
दुस-याच वाटेने
जायचं होतं.
| सवाष्णीच ठाण |
“दादा, वाघजाई पुढून
उतरणारा लिंग्या घाट आहे हा, आम्ही येथून
चढून येणार आहोत. आम्हाला देव घाटान उतरायचं आहे. देव घाटाकडे सोडा आम्हाला,” मी आमचा मनोदय
जाहीर केला.
शंकरदादांच
उत्तर तयारच होतं, “देव घाट खूप
लांब आहे त्या डोंगरापल्याड तिथ जायला अख्खा दिवस लागेल.” तरीदेखील, तुम्ही फक्त
वाटेला लाऊन द्या आम्ही आमचे आम्ही जातो, असे म्हणत आम्ही आमचं
घोड पुढं दामटलं.
आता
शंकरदादांना पर्यायच नव्हता. आम्हाला बिगी बिगी चलायला सांगून आल्या वाटेने माघारी
फिरत शंकरदा डावीकडे कारवीच्या जाळीत घुसले. १० मिनिटं कारवीचे ओरखडे सहन करत
पाण्याच्या वाटेने मंद उतरत
आम्ही एका घळीच्या तोंडाशी पोहोचलो.
घळीच्या
तोंडाशीच मधोमध एक सुळका दिमाखात उभा ठाकला होता त्याकडे पाहत दादांनी सांगीतले, “ह्यो आमचा देव, हितनं उतरुन
जा, सुळक्याच्या पाठीमागून उतरते वाट. कोनबी जात नाही आता या
वाटनं. दरड कोसळून वाट मोडलीय. बघा तुमाला मिळते का ते. सांभाळून जा, वाट नाही
गावली तर माघारी या गावात.” वाटेबद्दल
अधिक माहिती देऊन दादा माघारी फिरले. जाता जाता दादांनी पुन्हा एकदा देवाला
(सुळक्याला) दंडवत घातला.
आम्ही वाटेकडे
वळलो. वाट मोडली आहे अस दादा म्हणाले तरी बरीच मळलेली होती. नाणेघाटात गुहेपासून
खाली काही अंतर नागमोडी वळणाची दगडी वाट आहे अगदी तशीच हीदेखील. तीन-चार वळणं घेऊन
सुळक्याच्या पायथ्याशी पोहचलो. २०-२५ फूटांचा हा सुळका वाटेतच मध्येच असकाही दिमाखात
उभा होता, जणू काही येणाºया जाणा-यांवर
नजर ठेवण्यासाठीच. घाटाला देवघाट हे नाव या सुळक्यामुळेच पडले असावे बहुदा, असा विचार करत
पुढे उतरू लागलो तर समोरच आणखीन एक आश्चर्य आमची वाट पाहत होतं. उजवीकडच्या
डोंगराच्या पोटात एक विशाल नैसर्गिक गुहा आढळली. डोंगर कड्यावरून कोसळणा-या प्रपाताच्ये
हे प्रताप. अतिशीतल, शांत अशी आणि ५०-६० माणसं सहज सामावून घेणारी ती विस्तीर्ण गुहा
म्हणजे निसर्गाची किमयाच म्हणावी लागेल. आपसूकच कानदाट खो-यातील देवडोहाची आठवण
झाली आणि पावसाळ्यात वरुन कोसळणा-या विशाल धबधब्याचं दृश्य मनातल्या मनात रेखाटलं
गेलं. अश्या निसर्गरम्य घळींची निवड पूर्वी ऋषीमुनी तपश्चर्येसाठी का करत असावेत
ह्याची प्रचीती न यावी तर नवलच.
| नैसर्गिक गुहा |
प्रसाद आणि
सागर गुहेच्या मऊ मातीत उमटलेल्या पाऊल खुणांचा अंदाज बांधण्यात मग्न झाले, तर रोहनने
घुहेच्या तोंडाशी असलेल्या एका मोठ्या सपाट दगडावर आडवे होणे पसंत केलं. मनोज
फोटोग्राफीत गढून गेला आणि मी गुहेच्या वरच्या अंगाला असलेल्या खोबण्या पाहायला
निघून गेले. एका कपारीतून थेंब थेंब अखंड पाणी पाझरत होत. नाश्ता उरकून पुढे निघालो.
गुहेच्या तोंडाशी असलेल्या कड्यापाशी पोहोचलो तेव्हा लक्षात आल की पुढे वाट मोडली
होती. वाटेवरचे दगड पाण्यासोबत वाहून गेले आहेत. वावर नसल्याने घळीत झाड वाढली
आहेत. आणखी दहा मिनिटे उतरलो आणि वाट पुरती मोडलीच.
आता पुढची
उतराई पाण्याच्या वाटेने सुरु झाली. मोठ मोठाले धोंडे पार करत अखेर आम्ही एका
मोठ्या कड्यापाशी पोहोचलो. इथून खाली उतरण शक्यच नव्हतं. कुर्डुगडाकडे जाणारी वाट
डावीकडच्या जंगलातून पदरात जाते असा खुलासा शंकरदादांनी केला होता. प्रसाद
डावीकडच्या जंगलात घुसला आणि आम्ही कड्याच्या टोकाशी जाऊन बसलो. समोरचा देखावा
मंत्रमुग्ध करून सोडणारा होता. पाच-सहाशे फूट खोल दरी, दरी कसली चिंचोली घळच म्हणा की, त्यापलीकडच्या
डोंगरातून विलग झालेला एक गवताळलेला पदर आणि त्यावर लागवड केल्यागत समान अंतरावर
वाढलेली ऐनाची झाड.
| दरीच्या टोकावरून दिसणारे गवताळलेले मैदान |
त्या गवताळ
मैदानावर जाता आल तर! विचारासरशी तिथं कस पोहोचता येईल ह्याचा पडताळा घेत कड्याकपा-यांवरुन नजर
भिरभिरली. प्रकरण जरा अवघडच होत, पण प्रयत्न करायला
काय हरकत आहे या विचारतंद्रीत असताना प्रसादची हाक आली. त्याला पायवाट मिळाली
होती. कारवीचा आधार घेत निखळत्या मुरमाड मातीतून वर चढत पाच मिनिटात आम्ही
पायवाटेवर थडकलो. विस्तीर्ण पायवाट फक्त कारवीच्या विळख्यात हरवलेली. दहा-पंधरा
मिनिटे पुढे गेल्यावर उजवीकडे उबर्डी गाव दिसू लागलं, नाकासमोर
झाडामागून कुर्डुगडाचा सुळका डोकावू लागला तर डावीकडच्या पठारावर वाघजाई जवळील
छत्री नजरेस पडली. आणखी थोडे पुढे गेलो आणि एका अजस्त्र उंबराच्या झाडापाशी ही वाट
वाघजाई कडून येणा-या वाटेला मिळाली. येथे दोन गुळगुळीत गोटे मांडून ठेवले होते.
खुणेसाठी ठेवलेल्या अश्या गोट्यांना देव मानून गावकरी येताजाता त्याच्या पाया पडत
असतात.
| खुणेसाठी रचून ठेवलेले गोटे |
इथून कुर्डुगड फार-फार तर २० मिनिट. प्रसाद यापूर्वी कुर्डूगडाला जाऊन आला
असल्यामुळे त्याने खुलासा केला. अगदी दोन मिनिटांच्या चालीवर एक ठळक वाट
उजवीकडच्या रानात घुसली आणि शंकरदादांचे शब्द आठवले, उंबरापुढे एक
वाट उजवीकडे रानात वळेल ती घेऊ नका, ती उंबर्डी
गावात उतरते, सरळ वाट कुर्डू पेठेला जाते. २०-२५ मिनिटात
आम्ही कुर्डाई देवीच्या मंदिरापाशी पोहचलो.
मंदिरासमोरच्या
पायवाटेने गड चढायला सुरुवात केली. दहा मिनिटातच पाण्याच्या टाक्यापाशी पोहोचलो. टाक्याच्या
वरच्या अंगाला दगडात कोरलेला भग्नावस्थेतील दरवाजा आणि त्याला जोडून वर चढत जाणा-या काही पाय-या आहेत. इथून
एक चिंचोळी पायवाट गडमाची उजवीकडे ठेवत धामाणहोळच्या दिशेने फिरते. ह्या वाटेने
गडाच्या हनुमान बुरुजावर प्रवेश होतो. बुरुजावर एक सुबक कोरीवकाम केलेली मारुतीची
मूर्ती अशी काही रचून ठेवलेली आहे जणू काही घाटावराची वाघजाई आणि हा मारुती
एकमेकांकडे नजर रोखून पाहत असावेत. ह्या मूर्तीचे नाविन्य म्हणजे या मारुतीला मिशी
आहे. इथून पुढे गड सुळका डावीकडे ठेवत पुढे गेल की एक मोठं पाण्याचं टाक पाहायला
मिळत.
आल्यावाटेन
पुन्हा मागे येऊन गड उजवीकडे ठेवत पुढे गेलं की गड सुळक्याच्या पोटात एक भलीमोठी
नैसर्गिक गुहा तयार झालेली पाहायला मिळते. गुहेच्या छताच्या सतत पडणारे टोकदार
कपचे गुहाभर विखुरले होते. आणि त्याचमुळे निवा-यासाठी ही
जागा निरुपयोगीच म्हणायला हवी. तरी सध्या काही ठिकाणी थोडीफार जागा निवा-या पुरती
साफसफाई करून सपाट केल्याचे आढळले.
इथून पुढे
गडाच्या टोकाला, गड मुख्य सह्याद्री रांगेपासून विलग होतो
तेथे एक भक्कम बांधणीचा बुरुज अजूनही सुस्थितीत आहे. स्थानिक ह्यालाच कडेलोटाचा
बुरुज म्हणतात. बुरुजाच्या १३ पाय-या चढून एकदा जरूर मधल्या दरीत डोकवावे.
उजवीकडे गडाच्या मुख्य सुळक्यापासून सुटून आणखी एक छोटा सुळका उभा ठाकलेला दिसतो.
तो सुळका आणि गडाचा मुख्य सुळका यांच्या मधल्या खिंडीवजा खोबणीतून थोडी चढाई करून
वर आलं की दगडावर दगड कोसळून त्यांची अशीकाही अजब रचना तयार झालेली पाहायला मिळते
जणू काही एक अजस्त्र खिडकीच कोणीतरी बसवली असावी. ह्यालाच स्थानिक लोक कोकण खिडकी
म्हणतात. नेढ्यासदृश अशा या खिडकीतून थिबथिब्या घाटापासून पार केली नाळी, कुंभे घाट ते थेट माजुरणे पर्यंतच्या कोकणात
उतरणा-या सह्याधारा पाहावयास मिळतात.
जेवण उरकून
आणि थोडा आराम करून आम्ही गड उतरू लागलो तेव्हा दुपारचे दोन वाजले होते. उतरताना
टाक्यावर पाणी भरून घेतलं. आल्यावाटेने पुन्हा उंबराशी पोहोचायला पाउण तास गेला.
उष्मा खूपच वाढलेला त्यामुळे पुढची खडी चढाई जीव काढणार होती. जरा वेळ उंबराच्या
शीतल छायेत विसावून आम्ही उजवीकडच्या पायवाटेने घाट चढायला सुरुवात केली. वाट
चांगलीच मळलेली होती. धामाणहोळहून कोकणात उंबर्डी व कुर्डू पेठेत जाण्यासाठी हा
सगळ्यात जवळचा मार्ग असल्यामुळे चांगलाच वावराचा आहे. खडी चढण असल्यामुळे घाटमाथा
पटापट नजीक होत होता. मध्येमध्ये दगड रचून पाय-या केल्या
आहेत. अवघड वळणावर लाकडाचे वासे लावून वाट रुंद करण्यात आली आहे. १५ मिनिटांच्या
चढाईनंतर वाट गर्द राईत शिरते.
पुढे १५-२० पाय-या चढून वळणा-वळणाचा अखेरचा टप्पा
पार करून आम्ही वाघजाईच्या ठाण्यापाशी पोहोचलो तेव्हा दुपारचे साडेतीन-पावणे चार
वाजले होते. प्रचंड उष्म्याने चांगलाच घाम काढला होता. पर्यटकांसाठी बांधलेल्या
नजीकच्याच छत्रीत जाऊन सगळेच आडवे झालो. चांगली तासभर झोप काढून आम्ही गावाकडे
चालू लागलो.
गावात पोहोचलो
तेव्हा काळेदादा (ज्यांच्या
घराच्या व्हरांड्यात आम्ही रात्री मुक्काम केला होता ते) आणि शंकरदा
आमचीच वाट पाहत होते. “काय मग गावली का वाट पदरात पोचायला? कुठवर गेलात?”, शंकरदादांनी गेल्यागेल्या पहिला प्रश्न
विचारला.
आम्ही
कुर्डूगड पाहून आलो हे त्यांना पटलेलं दिसत नव्हतं. गावातील आणखी काही मंडळी
आमच्या भवती जमू लागलेली. प्रश्नांची सरबत्ती सुरु झाली. कुठं जाऊन आलात? कसे
गेलात?
“देव घाटानं उतरलो आणि लिंग्या घाटाने वर आलो” आम्ही तत्परतेने म्हणालो. आणि जोरात
नकारार्थी मान हलवत एकजण म्हणाला, “देव घाट, नाय नाय त्यो
तर चिक्कार लांब आहे.”
“हे काय शंकरदादा आले होते की सोडायला...” आम्ही आपले देवघाटातच अडकलो होतो.
त्यावर
दादांनी हलकेच गौप्यस्फोट केला, लिंगदेवाच्या
वाटेल लाऊन दिलं आणि निसणीनं आल्येत ते वर...
गुगल अर्थ
सुरु केल्यावर स्क्रीनवर गरगर फिरणाºया पृथ्वी
गोलाप्रमाणे या दोन्ही वाटा माझ्या डोक्यात गरगर फिरु लागल्या. हा सगळा काय गोंधळ
आहे काही कळेनासं झालं. आता हे काय आणखीनच नवीन म्हणत सगळेच एकमेकाकडे प्रश्नार्थक
नजरेने पाहत राहिले. पाठीवरच्या सॅका बाजूला आपटून आम्ही घोळक्यात शिरलो. “दादा काय ते नीट समजवा. वाघजाई देवीकडून
उतरते तीच लिंग्या घाट ना?”
“नाय नाय ती झाली निसणीची वाट. आणि सकाळी
जेथून तुम्ही उतरलात तो झाला लिंग देवाचा घाट. लिंगोबा आहे ना तिथे म्हणून त्याला
लिंग्या घाट म्हणत्यात. आधी त्योच घाट वापरात होता. हे टॉवरच काम केलं तेव्हा
निसणीची वाट सोपी करून घेतली, सामान
वाहतुकीसाठी. त्योच जवळ पडतोय म्हणून आता तिथूनच ये-जा होते. वापर नाही म्हणून
लिंग्याघाटात जंगल माजलंय.” इति
शंकरदादा.
“मग देव घाटाच काय? तो कुठे आहे?”
आतामात्र काळे
दादांच्या मागे बसलेल्या वयाने पोक्त दिसणाºया दिनकर
मामांनी पहिल्यांदाच तोंड उघडलं. “देव घाट त्या
(उजवीकडे हातवारे करत) डोंगराच्या पलीकडे आहे. खूप लांब चालत जाव लागतंय. कोणबी
जात न्हाय बगा आता तिथं. पूर्वी पायºया होत्या.
गुरांचा वावर होता. कोकणातील मानस चौर्यावर, दुर्गाडीला
गुर घेऊन यायची चरायला. आता गुरच नाही राहिलीत कोणाकडे. हितन तर कधी कोणी गेलाच
नाही खाली. पण मला माहित आहेत वाट कुठं आहे ते. सात-आठ वर्षांपूर्वी चौºयावर टाकी साफ
करायला गेलो होतो आम्ही.”
“टाकी? पाण्याची टाकी
आहेत वाटेवर?” हे सार ऐकून
आम्हाला वेडच लागायचं बाकी होतं.
चौ-यावर टाकी
आहेत पाण्याची. पुढच्यावेळी या, घेऊन जातो तुमास्नी, असे म्हणत
त्या पोक्त माणसानं आमच्या डोक्यात विचारांचा भुंगा सोडला. गावक-यांचा निरोप घेऊन
परतीला लागलो तेव्हा डोक्यात लिंग्या, निसणी आणि देव
घाटाच कोड रुंजी घालत होत. त्यात आणखी एका नव्या नावाची भर पडली ती म्हणजे “चीपेच दार”.
कधी एकदा घरी
पोहोचतेय आणि ह्या कोड्याची उकल करतेय अस होऊन गेलेलं.
सोमवारचा
अख्खा दिवस नकाशे, संदर्भ पुस्तकं, गुगलअर्थ, विकीमॅपिया, तसेच आधी या
भागात भटकलेल्यांचे ब्लॉग वाचण्यात गेला. गावक-यांकडून मिळालेल्या माहितीस पूरक
असा फक्त एक टॅग मिळाला विकीमॅपियावर. कोणीतरी सुळका टॅग केलेला लिंग्या घाटातला.
एका संदर्भ पुस्तकातील नकाशात वाघजाई जवळ देव घाट दाखवला होता आणि तसाच टॅग
गुगलअर्थ वरही पाहायला मिळाला. बहुदा हाच नकाशात पाहून हा टॅग केला गेला असावा.
माझं सह्यभ्रमंतीच बायबल म्हणजे पाळंदे सरांच ‘डोंगरयात्रा’. त्यात
निसणी/देव अशी नोंद होती, आणि नकाशात दोन्ही
घाटांचा पत्ता नव्हता. ह्यातून नेमका काय बोध घायचा हे कळेना. हे दोन्ही घाट एकच
असावेत का? तसे असले तरी नेमका लिंग्या घाट कोणता आणि निसणीची वाट कोणती?
लॉजिकल विचार केला
तर गावक-च्या बोलण्यात तथ्य दिसते. घाटाच्या मुखाशी असलेला सुळका, त्याला लिंगी
संबोधले जाते. त्याच घाटावर लक्ष ठेवाणार लिंगदेव/लिंगोबा झाला. आणि ह्याच
लिंगोबाच्या अस्तित्वामुळे ह्या घाटाचे नाव लिंग्याघाट पडले असावे. इतर काही ब्लॉग
आणि ट्रॅव्हलॉगमध्ये (जिथे
निसणीच्या वाटेला लिंग्या संबोधले आहे). घाटाला लिंग्या नामकरणामागे येथून
कुर्डूगड लिंगीसारखा दिसतो म्हणून लिंग्या घाट असा उल्लेख आढळला.
वास्तविक
पाहता, सुळका असलेला घाट जर लिंग्या घाट असेल तर ही वाट दोन
डोंगरांच्या घळीतून डावीकडे उतरत पदरात शिरते. घळीतून उतरताना कुर्डूगड दिसतच
नाही. कुर्डूगडाचे दर्शन थेट पदरात घुसल्यावर होते. इतर वाटांशी तुलना केली तर असं
लक्षात येत की निसणी हे नाव जराशा अवघड श्रेणीच्या, अशा वाटांवर
जिथे अवघड टप्प्यांवर बांबू, वासे लावण्यात
आले आहेत, अथवा चिंचोळी वाट थेट डोंगर धारेवरून काढली
असेल तर वापरले जाते. वाघजाई जवळील वाट ह्याच प्रकारात मोडते. त्यामुळे तिला निसणी
हेच नाव अधिक साजेसे वाटत. तस गृहीत धरल तरी मग देव घाटाच काय हा प्रश्न कायमच
राहतो.
ह्या सगळ्या
प्रश्नाची उत्तरं देव घाटाच अस्तित्व पडताळूनच मिळू शकणार होती.
हे कोड
सोडवल्याशिवाय डोक शांत होणार नव्हत, मग पुढच्याच
रविवारी पुन्हा एकदा धामणहोळ गाठून देवघाट-चीपेचं दार अशी भ्रमंतीची मोहीम आखली.
देव घाटात पाण्याची टाकी आहेत हे कळल्यापासून हा घाट पाहण्याचे वेध लागले होते.
कोकण आणि घाटाला जोडणाºया मुख्य
वाटांवर अशी पाण्याची टाकी खोदलेली आढळतात. घाटात पाण्याची टाकी असं म्हणजे घाट
कधीकाळी चांगलाच वावराचा असणार यात शंकाच
नाही.
घाटवाटांचे पझल भाग २ CLICK HERE
घाटवाटांचे पझल भाग २ CLICK HERE


fantastic trek,,,,HAT"S OFF !!!!!
ReplyDelete