शनिवारी अर्ध्या दिवसाची कल्टी मारुन दिवसा उजेडीच धामणहोळ गाठायचा प्लॅन होता. आदल्या खेपेला प्रचंड उष्म्याने झालेले हाल लक्षात घेता उन्हाळी ट्रेकच्या दृष्टीने माणशी निदान पाच लिटर पाणी सॅकमध्ये कोंबले. पवनला भरपूर ताक, दही घ्यायच्या सूचना दिल्या. राजसने जलजीराचा स्टॉक घेतला. माझी सॅक, शूज, रोप आणि इतर इक्विपमेंट लोड करून गाडी राजसच्या सुपूर्द केली. पण जैसे योजिले तसे घडावे तर तो ट्रेक कसला. राजस काही कामात अडकला आणि निघे निघेस्तोवर पाच वाजले. त्यात अवेळीच पावसाने हजेरी लावली. सगळं सुमंगल घडत होते. ना विंडचिटर घेतलेलं ना सामान प्लास्टिकमध्ये बांधलेलं. खंडाळा घाटात पोहोचलो आणि दुपारीच धामणहोळ गाठलेल्या चमूचा फोन आला, इथे रिमझिम पाऊस पडतोय आणि भरीस भर म्हणून गावकरी देव घाटाला सोडायचे सव्वा तीन हजार रुपये सांगत आहेत.
“सव्वा तीन” मी बसल्या जागीच उडाले.
“काय करतेयस येतेयस की मागे फिरतेय.” पलिकडून विचारणा झाली.
मागे फिरण्याचा प्रश्नच येत नाही. वाटाड्याचं उद्या पाहू सकाळी, कोणी नाही आल तर घुसू आपणच आणि पावसाच काय एवढं. पावसाळ्यात तरी काय आपण घरी बसतोय होय. होऊन जाऊ देत अवेळी मान्सून ट्रेक.
रात्री ११ वाजता गाडी गावात शिरली तेव्हा गाव चिडीचूप निजले होते. काळे दादांच्या व-हांड्यात सगळ्यांनी ताणून दिली. रात्रभर अखंड पाऊस कोसळत होता. सकाळचा पाच-साडेपाच-सहा-साडेसहाचा अलार्म बंद करत आम्ही निपचित पडून राहिलो. उठून करणार तरी काय होतो. आभाळ फाटल्यासारखा पाऊस कोसळत होता आणि सगळीकडे काळ्या मिट्ट अंधाराचं साम्राज्य होतं. अखेर सात वाजता जरा पावसाचा जोर कमी झाला. आम्ही पटापट आवारावर केली. दिनकर मामा अचानक आजारी पडले होते. गावातील इतर कोणालाही देव घाट अचूक माहीतच नव्हता. त्यात पावसामुळे रानात शिरायला कोणीच तयार होईनात. आता काय करावे विचार करत उभे होते एवढ्यात शंकरदादा समोर आले.
“दादा, बघाना कोणीच यायला तयार नाहीये. तुम्ही तरी चला, नुसतं वाटेला लावून द्या, पुढे जाऊ आमचे आम्ही.” आम्ही दादांना गळच घातली.
पण शंकरदादा देवघाटाने कधीच गेलेले नसल्यामुळे त्यांनी चौ-यापर्यंत सोडायचं कबूल केल्यावर आम्ही जास्ती ताणलं नाही. आलोच म्हणत दादा गावात गेले. पाच मिनिटांनी कुठूनशी दहा-बारा कुत्री आणि तीन-चार पोर बरोबर घेऊन दादा हजर. “आता रानात जायचं म्हणजे कुत्री हवीतच आणि परतीला सोबतपण होईल या पोरांची. वाटेवर कुठं काय जनावर असंल, रानात धोका असंल तर ही कुत्री आवाज करतील. असुदेत बरोबर” दादांच्या या लॉजिकवर काही न बोलता अखेरीस सव्वा आठ वाजता आमचा हा सारा ‘शाही’ लवाजमा देवघाटाकडे निघाला.
निसणी, लिंग्या घाट डावीकडे ठेवत आम्ही उजवीकडची डोंगररांग चढू लागलो. गावापासून १५ मिनिटे सरळ चालून मग एक टेकडी चढून पलीकडे पोहोचलो. वाट जुनी असली तरी कारवीचे रान माजले होते. शंकरदा कोयतीने कारवी छाटत चालाण्या पुरती वाट मोकळी करत होते. गावातून सोबत निघालेली श्वानगँग आणि दोन पोर वाट वाकडी करून कधी निसटली कळलंच नाही. उरले ते शंकरदा आणि त्यांचा राजा, मारुतीदादा आणि त्यांचा काळू. दोन्ही कुत्री पुढे पुढे धावून वाटेत काही धोका नसल्याची खात्री करत होती. मालकाने एक हाक दिली की परत शेजारी हजर. मालक थांबला की हे पण त्याच्या शेजारी येऊन बसत. ह्यांच्या इमानाला तोड नाही खरच.
टेकडी ओलांडून कड्यापाशी आलो. कारवीची जाळी जरा मोकळी केली तेव्हा लक्षात आलं आम्ही लिंग्या घाटातील नैसर्गिक गुहेच्या माथ्यावर उभे होतो. समोर लिंग्या घाटातून दिसलेली दरी पसरली होती. त्यापलीकडे उजवीकडे दूरवर उंबर्डी गाव आणि नाकासमोर कुर्डूगडाचा सुळका. त्यापलीकडे थिबथिब्या ते माजुर्णे पर्यंतची सह्याद्रीची रांग ढगांशी लपंडाव खेळत होती.
| देव घाटाच्या वाटेवरून दिसणारा कुर्डूगड |
घाटावरची बोचरी हवा अंगावर शहारे आणत होती. त्यातच अधूनमधून येणा-या सरींमुळे चांगलेच भिजायला झाले होते आणि अधिकच थंडी वाजत होती. आणखी एका टेकडीच्या पायथ्याशी फेरा घालत आम्ही एका घळीत पोहोचलो. चालता चालता मारुतीदादांशी गप्पा रंगू लागल्या. एक मुलगी अशी दूरवर डोंगरवाटा तुडवत इथवर येते ह्याचं त्यांना विलक्षण कौतुक वाटत होतं. प्रत्येक टप्प्यावर मी व्यवस्थित पोहोचतेय की नाही ह्याकडे त्यांच नीट लक्ष होतं. त्यांना जंगलाची बरीच चांगली माहीती दिसत होती. त्यांच्याकडून दीपाच्या वनाची माहिती मिळाली आणि पुन्हा एकदा धामणहोळला येणे होणार हे निश्चित झाले.
गावापासून साधारण तासभराच अंतर कापल्यावर आम्ही एका खिंडीपाशी पोहोचलो. डावीकडे एक मोठी वाट उतरत होती. ही वाटदेखील कारवीत बुडालेली. समोर दिसणाºया खिंडीच्या डावीकडे डोंगर माथ्यावर भलमोठ सपाट गवताळ मैदान दिसत होतं. गावकरी याला दुर्गाडी म्हणतात. मैदानावर गुरांना चरण्यासाठी आणल जात, त्यामुळे इथवरची वाट जरा तरी शाबूत आहे.
| देव घाट पहिला टप्पा सुरुवात |
“हा बघा मॅडम देवघाट हितनचं सुरु होतो.” शंकरादादांनी डावीकडे वळण्याचा इशारा केला. दादा पुढे होऊन कोयत्याने फांद्या छाटत वाट मोकळी करत होते. पाचच मिनिटात वाट पुन्हा झाडांच्या दाट जाळीशी येऊन लुप्त झाली. एवढी मोठी झाड तोडत जाण्यापेक्षा बाजूच्या पाण्याच्या मार्गाने उतरणे अधिक रास्त होते. मारुती दादा सांगू लागले, इथून चौºयापर्यंत चांगल्या घडीव दगडी पाय-या बांधलेल्या होत्या. पण वापर नसल्यामुळे ३०-४० वर्षात जंगलाने सगळ्याचा ताबा घेतलाय.
आता पावसाने चांगलाच जोर धरला होता. रात्रभर झालेल्या पावसामुळे निसरड्या झालेल्या दगडावर कसाबसा तोल सांभाळत, झाडांच्या फांद्या चुकवत आम्ही उतरू लागलो. ओल्या दगडावर बिलकुल ग्रीप न देणारे माझे वैनब्रेनर शूज सारखे घसरत होते. एकंदर वेग फारच मंदावला होता.
थोड्या थोड्या अंतरावर दादा उजवीकडे जंगलात घुसून पायवाट शोधत होते. आम्हाला दुर्गाडीच्या डोंगराला वळसा घालून पदरातील गवताळ मैदानावर पोहचायचे होते. ह्याच टप्प्यावर पाण्याची दोन टाकी खोदलेली आहेत. मैदान साधारण चौकोनी आकाराचे असल्यामुळे ह्याला चौºया म्हणत असावेत बहुतेक. साधारण अर्धा तास नळीतून घसरपट्टी करून अखेर आम्ही पायवाटेला लागलो. घनदाट जंगलातून चालताना उजवीकडे दुर्गाडीचा कडा आणि डावीकडे लिंग्या घाटातून दिसलेली दरी असा आमचा प्रवास सुरु झाला. एके ठिकाणी रान मोकळे झाले आणि आम्ही दरीच्या तोंडाशी पोहोचलो.
| देव घाट : लिंग्या घाट यांच्या माधीन दरी |
समोर कुर्डू गडाचा सुळका, डावीकडे लिंग्या घाटाची घळ आणि मध्ये दरी, असा नयनरम्य नजारा दिलखुश करून गेला. दरी डावीकडे ठेऊन चिंचोळ्या वाटेने पुढे होत आम्ही दहा मिनिटात चौ-यावर पोहोचलो.
मागच्याच रविवारी समोर लिंग्या घाटाच्या कड्यापाशी बसून ह्या मैदानाकडे पाहताना इथे कसं पोहोचता येईल ह्याचा विचार करताना वाटलं नव्हतं इतक्या लवकर येथे पोहचू म्हणून. संपूर्ण पठारावर सोन पिवळ गवत उगवलेलं आणि लागवड केल्यागत एका रांगेत असलेली ऐनाची निष्पर्ण झाडं दिमाखात डोलत होती. पाण्याच्या टाक्यापाशी मंडळी जरा विसावली.
| चौऱ्या वरील पाण्याची टाकी |
शंकरदादा आणि मारुतीदाद पठाराच्या टोकाशी जाऊन खाली घळीकडे उंगली निर्देश करत काहीतरी गहन चर्चा करण्यात गढून गेले होते, आणि त्यांचे इमानी सवंगडी जस काही सगळं उमजत असाव अशा अविर्भावात ऐकत होते.
मारुतीदादांनी आम्हाला येथूनच उजवीकडच्या घळीतून उतरणारी वाट समजावून दिली. “एकदा कोकणात उतरलात की ओढ्याच्या बाजूने चालत गेलात म्हणजे तासाभरात उंबर्डीत पोहोचाल” इति मारुतीदादा.
उंबर्डी तसं बरंच लांब दिसत होत. त्यात घाट वाट कशी असेल, उतरायला किती वेळ लागेल ह्याचा काहीच अंदाज बांधता येत नव्हता. मारुतीदादांकडून लिंग्याघाट कुठून चढतो ते समजावून घेतले. उंबर्डीत जाण्यापेक्षा लिंग्या घाटाने पदरात पोहोचून कुर्डूगड पेठ गाठणे जास्त रास्त वाटत होते.
शंकरदादांना इथून पुढच्या वाटेची जराही कल्पना नव्हती. एकटेच आले असते तर कदाचित आम्हाला इथवर सोडून ते परत गेले असते. पण कोयता हाती घेऊन मारुतीदादा पुढे झाले. जंगल इतकं दाट, त्यात काळवंडलेल आभाळ, जणूकाही संधीप्रकाशातच वाटचाल करत होतो. वाट अजिबातच नाही, मोठ्या मोठ्या वेलींची जाळी जमिनीपर्यंत गुंतत गेलेली. आधाराला फांदी धरावी तर बोटात काटे रुतत होते. वेली फांद्यांच्या जाळीतून कसेबसे घसपटत साधारण १५ मिनिटात आम्ही एका घळीच्या तोंडाशी येऊन पोहोचलो. समोरच्या पदरावर चौºया सारखेच गवताळ मैदान दिसत होते. घळीच्या तोंडाशी रचून ठेवलेल्या दगडांवरून लगेच लक्षात आलं की, ही देवाघाटाच्या दुसºया टप्प्याची सुरुवात असणार. पाऊस थांबण्याचे काही चिन्ह दिसत नव्हते.
मारुतीदादा डावीकडे हात करत घळ न सोडता नाकासमोर उतरण्याची सूचना करत म्हणाले, “अजिबात डाव उजवं घुसायच नाही. आम्ही इथनं मागे फिरतो. पुढची वाट आम्हाला माहित नाही. कोकणातील लोक हितन गुर घेऊन यायचे तेवढंच ऐकिवात आहे....”
शंकरदादांनी जबाबदारी संपल्याचं सांगत सांभाळून जायला सांगत, वाट गावली नाही तर गुमान माग फिरुन गावात येण्याची दटावणी गेली.
| देव घाट दुसरा टप्पा सुरुवात |
दुपारचे १२ वाजून गेले होते, आता पावसाचा जोर वाढू लागला. आम्ही पटापट उतरायला सुरुवात केली. दगडाने आच्छादलेल्या नागमोडी वाटेवर मोठ मोठे वृक्ष कब्जा करून बसले होते. दहा मिनिटे उतरत वाट सरळ पुढे बाजूच्या घळीत शिरली. जंगलाच्या जाळीतून बाहेर पडून मोकळ्यात आलो आणि पठारावरून मामांची हाक ऐकू आली. मागे फिरा वरच्या घळीतून उतारा ह्या घळीत टप्पे आहेत.
धन्य ते मारुतीदादा. किती काळजी करावी आमची. आणखी बराचवेळ मारुतीदादा ओ देत राहिले. घळीत आमचा आवाज जसजसा आणखी खोल जाऊ लागला तसे ते दोघे गावाकडे निघाले.
जरा खाली उतरताच वेलींच्या जाळीने वाट अडवली. त्यात घुसणे अशक्यच होते. बाजूनेच वाहणाºया पाण्याच्या वाटेला लागण्याशिवाय पर्याय नव्हता. मोठ मोठे खडक उतरत पुढचा प्रवास सुरु झाला. पाऊस थांबायचे चिन्ह नसल्याने उभ्या उभ्याच नाचणी चिप्स आणि ताक ढकलून भुकेल्या पोटाला जरा आधार दिला. पाठीवरच्या सॅकमध्ये पाच लिटर पाणी होते आणि त्यातले अजून घोटभरदेखील वापरले नव्हते. वातावरणातल्या गारव्यामुळे तहान अशी लागलीच नव्हती. दगडावरून वाहणारे गार पाणी तोंडाचा चंबू करून गटकण्यातली मजा काही औरच होती. तासाभरात आम्ही कोकणात उतरलो. उंबर्डी गाठायचे म्हणजे तासाभराची चाल होती. तो विचार सोडून सरळ लिंग्या घाटाने पदरात पोहोचायचे ठरले. पण त्याआधी ओहोळाच्या शेजारी एक सपाट दगड हेरून पोटोबा शांत करून घेतला.
गावच्या वाटाड्याची जागा प्रसादने घेतली. आमचा खाणं उरकायच्या आत हा जंगलातून ओरडत आला वाट मिळालीये. खरतर वाट नव्हती मिळाली, पण कोळी राजाच्या वाड्याचे जोते मिळाले होते. रात्री गावक-यांशी झालेल्या देवघाटाबद्दलच्या गप्पांमध्ये घाटाच्या सुरुवातीला कोकणात कोळी राजाच्या वाड्याचे अवशेष अजूनही पाहायला मिळतील असे कळले होते, त्याचीच पुष्टी झाली होती. लिंग्या घाटाची पायवाट इथूनच कुठूनतरी जात असणार ह्यात शंका नव्हती.
| कोळी राजाच्या वाड्याचे अवशेष |
वाड्याचे सगळे अवशेष पाहून डोंगर कडा डावीकडे ठेवत, दगड झुडपाच्या जाळीतून आम्ही चढायला सुरुवात केली. नेहेमीप्रमाणे प्रसाद सगळ्यात पुढे होता. वाटेत येणाºया वेली-फांद्या साफ करत त्याची चढाई फारच धीम्या गतीने होत होती. मला अश्या मुंगीच्या वेनागे पुढे सरकायचा कंटाळा आलेला. एक दोनदा त्याला ओरडले की नको करूस वाट मोकळी आम्ही येतो कसेही. पण त्याने त्याकडे सपशेल दुर्लक्ष केले. अखेर वैतागून मी आपली स्वत:ची वाट काढत झपाझप पुढे गेले, यज्ञेश आधीच डावीकडून वर चढून आला होता. थोडा आणखी चढलो आणि अखेर स्पष्ट पायवाटेला लागलो.
हाच तो लिंग्या घाट, धामणहोळ ते उंबर्डी अशी ये-जा सतत सुरु असल्यामुळे वाट चांगली मळलेली आहे. रस्त्यात खुणेसाठी दगडांवर तसेच झाडांवर पांढºया रंगाने वर्तुळं काढलेले आहेत. दुपारचे सव्वादोन वाजले होते. इथून पदरात पोहोचून कुर्डूपेठ गाठून चीपेच्या दाराने चढून जाण्यासाठी पुरेसा वेळ हातात होता. तसाच विचार करून पटापट चढायला लागलो.
| निशाणीच्या वाटेवरून दिसणारा देव घाट |
पदरात पोहोचतोय ना पोहोचतोय तोच संपूर्ण परिसर धुक्यात गडप झाला. आकाशात काळ्या ढगांनी गर्दी केली आणि पावसाला सुरुवात झाली. तीनच वाजले होते पण नवी वाट चढायची आणि सभोवतालचा परिसरच पाहता येणार नसेल तर काही अर्थच नाही ना. नाईलाजाने चीपेच्या दाराचा विचार सोडून दिला आणि आम्ही निसणीच्या वाटेला लागलो. वाघजाईच्या ठाण्याशी पोहोचलो तेव्हा साडेतीन पावणे चार वाजले असावेत. छत्रीत जाऊन विसावलो आणि दहाच मिनिटात सगळ धुकं विरून गेलं. काळे मेघ वा-यासोबत पुढे निघून जाऊ लागले. आजूबाजूचा सगळा परिसर सायंकाळच्या सोनपिवळ्या प्रकाशात उजळून निघाला होता. निसर्गाने चांगलीच थट्टा केली होती आमची. समोर चीपेचं दार खुणावत होतं, पण आता पुरेसा वेळ शिल्लक नव्हता. डोंगराकडे पाहत मनातल्या मनातच म्हटलं, राहिलं मित्रा या खेपेला पण येऊ लवकरच तुला भेटायला. पवनने त्याच्या पोर्टेबल स्टोव्हवर गरमागरम सूप बनवून दिलं. दिवसभर भिजल्यामुळे भरलेली हुडहुडी कमी व्हायला जरा मदत झाली.
पुन्हा एकदा खादाडी उरकून आम्ही गावाकडे निघालो. वाटेत जुन्या मंदिरापाठची दगडी विहीर पाहून आम्ही गावात पोहोचलो. आमचे दोन्ही वाटाडे आमच्या वाटेकडे डोळे लाऊन बसले होते. शंकर दादांनी चहा घेतल्याशिवाय जाल तर बघा अशी तंबीच दिल्यामुळे कपडे बदलून सॅका आवरून आम्ही दादांच्या घरी गेलो. चहा घेताघेता पुन्हा एकदा घाट वाटेची माहिती तपशीलवार लिहून घेतली.
गप्पा मारताना शंकरदादानी पुढच्या खेपेला चीपनं उतरू आणि दीपानं वर येउ असा कर्जत कसारासारखा भलामोठा क्रॉसकंट्री तंगडतोड ट्रेकचा प्लान मांडला. दोन वेळा आडवाटा धुंडाळून सुखरुप परत आल्यामुळे बहुदा आमच्या स्टॅमिन्यावर शंकरदादांना भलताच कॉन्फिडन्स आलेला दिसत होता. पोर चालत्यात तर ब्येस फिरवू शकतो ह्यांना!!!
पुन्हा यायचा वायदा करत जड अंत:करणाने गावक-यांना निरोप दिला. गाव सोडला तेव्हा पावसाची रिमझिम सुरु झालेली. लोणावळा-खंडाळा घाटात पावसाने अक्षरश: झोडपून काढले. घरी पोहोचायला रात्रीचा एक वाजला. आंघोळ करून सुईने हातात रुतलेले काटे काढायला बसले. एक, दोन, तीन, चार ... मोजणेच सोडून दिले. एवढी भटकंती केली सह्याद्रीत, पण घाटवाटेवर एव्हढं दाट जंगलं वाढल्याचं पाहीलं नव्हतं. मारुतीदादा नसते आले तर वाट सापडण जवळजवळ अशक्यचं होतं. चीपेचं दार राहीलं असलं तरी लिंग्या घाट पूर्ण झाला होती. त्याहूनही अधिक समाधान म्हणजे अखेर आठवडाभर डोक्याला मुंग्या आणणा-या प्रश्नाची उकल झाली होती.
मात्र आम्ही केलेली भटकंती आणि नोंदी पडताळून पाहणे गरजेचे होते. त्यासाठी डोंगरयात्रेतील गुरु आनंद पाळंदे सरांशी बोलून त्यांना ब्लॉग पाठवून दिला. त्यांनी देखील आत्मीयतेने सारे तपशील वाचले आणि एकेदिवशी त्यांचा फोन आला. आमच्या तपशीलवार नोंदीचे कौतुक केले आणि देवघाटाच्या आमच्या भटकंतीमुळे त्यांच्या नोंदीत भर पडल्याचे सांगितले. हा खरा आनंदचा क्षण होता.
सह्याद्रीत आता नवीन भटकण्यासारखे, नोंदविण्यासारखे काहीच नाही असे एक पालुपद गेली अनेक वर्षे अनेकवेळा अनेकांकडून ऐकायला मिळाले होते. मात्र आमचा छोटासा चमू गेली सात आठ वर्षे ठरवून आडवाटांवरच भटकत होता. गावक-यांच्या बोलण्यात नवे संदर्भ मिळायचे, कधी ते पडताळून पाहता यायचे कधी काहीच माग लागायचा नाही. धामणओहोळात मात्र देवघाटाने आम्हाला अशाच एक विस्मृतीत गेलेल्या वाटेवर आणले. अनेक वर्षे वावर नसलेल्या वाटेवर मनसोक्त भटकता आले. पाण्याची टाकी, कोळी राजाच्या वाड्याचे चौथरे अशा खुणांनी घाट राबता असल्याचे दाखवून दिले. आणि सह्याद्रीतदेखील अजून शोधायला भरपूर वाव आहे याची प्रचीती आली.
डोंगरात भटकायचे कशासाठी, आनंदासाठी तर नक्कीच. पण नव्याची आस ठेऊन असे काही मिळालच तर तोच आनंद शतगुणित झाला अस म्हणायला काहीच हरकत नाही.
Awesome trek!!! Nice writeup!!!!
ReplyDeletekhupach chan priti! nehmichya treks var ata bharpur gardi hou lagli ahe ani yetya kahi varshat tyanche picnic spots suddha hotil :/ :(
ReplyDeletenavnavin treks shodhaychi kharach garaj ahe...keep up the mission....would definitely like to join you on an expedition some day :)
शाब्बास
ReplyDeleteZakkasch varnar lihile aahes Priti tu tar. Vachun me suddha tumchya barobar trek kartoy ki kay asech vatale
ReplyDeletekhup khup sundar
ek number... "पुढच्या खेपेला चीपनं उतरू आणि दीपानं वर येउ " he pan zale ki ajun karayche ahe?
ReplyDeleteI go through your articles in Lokprabha, but surprised that you don't add those articles in your blog. Pl. do it as it will help us to access all your articles in Lokprabha at single place. Keep writing.
ReplyDelete