हा लेख आजच्या साप्ताहिक सकाळ च्या अंकात छापून आला आहे, ज्यांना अंक मिळू शकत नाहीये, त्याच्यासाठी हा ब्लॉग
कारवी!! सह्याद्रीत
तंगडतोड करणाऱ्यांना हा काही नवखा शब्द नाही. डोंगर उतारांवर वाढणारी ही झुडूप वजा
वनस्पती म्हणजे सह्याद्रीला लाभलेले एक अमूल्य वरदानच म्हणायला हवे. सात आठ वर्षे
उंच उंच वाढणारी ही झुडपे अशी काही दाट जाळी निर्माण करतात की भर उन्हाळ्यातही ह्या
जाळीच्या छायेतून फिरताना उनाचा दाह जाणवू नये. एव्हडेच काय तर डोंगर उतारावरून
मुरमाड मातीतून तोल सांभाळत उतरताना आधारासाठी मदतीचा हात पुढे करत उभी असतात ती
हीच कारवीची झाडे. कारवीची मुळे जमिनीत अशी काही जाळी गुंफतात की वाऱ्या-पावसामुळे
होणारी जमिनीची धूप आटोक्यात येते. जमिनीत खोल शिरणारी कारवीची मुळे पाण्याचा
जमिनीतील पाझर वाढवून भूजल स्थर वाढवण्यास हातभार लावतात. ह्याच कारवीच्या दाट
जाळीच्या आश्रयाला वाढतात अनेक ground orchids आणि lilies ज्याचे गुरांपासून संरक्षण
करते ही करावी. कारवीची पाने जनावरांच्या चाऱ्यास उपयोगी पडतात. तर अनेक कीटकांना
खाद्य, निवारा आणि संरक्षण मिळते ते ह्याच कारवीच्या झुडपांवर.
![]() |
| P.C. : Rajas Deshpande |
ह्या कारवीचे अनोखे
वैशिष्ट्य म्हणजे तीचे mass flowering (एकत्रित बहर), श्रुष्टीचा
एक अलौकिक रंग सोहळा. ही झाडे सलग सात वर्ष वाढतात आणि आठव्या वर्षी सर्व झाडे एकाच
वेळी फुलतात. जांभळ्या रंगाची टपोरी फुले लेऊन जेव्हा ही झाडे संपूर्ण बहरतात
तेव्हा डोंगर उतारांना त्या रंगाच्या छटा प्राप्त होतात. ह्या फुलांमधे भरपूर पराग
आणि मकर मिळतअसल्यामुळे मधमाशा ह्या बहराच्या वेळी कारवीच्या जाळीवरच डेरा देऊन
बसतात. महाबळेश्वर भागात आदिवासी लोकं हा करावीच मध गोळा करतात. अधिक दाट आणि गडद
रंगाच्या ह्या मधाची बाजारात चढ्या भावाने विक्री होते.
| कारवीच्या आडोश्याला वाढणारे ground orchid |
ह्या कारवीच्या
आश्रयाला वाढणारे अनेक कीटक जंगलातील इतर वृक्षांच्या pollination (परागीभवना /
परागीकरणा) मधे महत्वाची भूमिका निभावत असल्यामुळे कारवी जंगल संवर्धनास अप्रत्य
रीत्या का होईना पण मोलाचा हातभार लावते. बहर ओसरलाकी कारवीची बोंडे सुकू लागतात.
ह्या बोंडांवर तरळणारा चिकट तरल द्रव चाखायला गुरांना आवडते. बोंडा मधील बिया पक्व
झाल्या की जीवन चक्रातील महत्वाची म्हणजेच प्रजननची आपली जबाबदारी पूर्ण केलेली ही
झाडे आठ वर्षाची तपस्चर्या पूर्ण करून कृतज्ञतेने आपला जीवन काळ संपवतात. जून
महिन्यात पहिल्या पावसाच्या सरीच्या माऱ्याने ही बोंडे तड तड आवाज करत फुटतात आणि
त्या झटक्याने आतील बिया दूरवर भिरकावल्या जातात.
| कारवीच्या मुळावर जगणारे परजीवी Fungus |
| टोपली कारवी |
एक ते १४ वर्षे अंतराने फुलणाऱ्या कारवीच्या अनेक जाती आहेत. त्यातल्या त्यात डोंगर भटक्यांच्या परिचयाच्या दोन जाती म्हणजे तीव्र उताराच्या डोंगरावर उंच वाढणारी कारवी strobilanthes callosus आणि टेकडी अथवा पठारावर वाढणारी तुलनेने खुजी strobilanthes sessilis म्हणजेच टोपली कारवी.
कारवी मावळात, माळशेज घाटात, भंडारदरा तसेच त्र्यंबक परिसरात
मुबलक पाहायला मिळते तर टोपली कारवी कास, चाळकेवाडी पठार, अंबोली, राधानगरी ह्या
परिसरात मोठ्या प्रमाणात उगवते. २००८ साली झालेले कारवीचे mass flowering जरी मी
पहिले असले तरी त्यावेळी कारवीच्या ह्या बहुपयोगी गुणधर्मांबद्दल असलेल्या
अनभिज्ञते मुळे ह्या पुष्पोत्सावाचा मनमुराद आनंद लुटता आला नव्हता. गेल्या वर्षी
पावसाची नाराजी झाल्यामुळे कारवी तुरळकच फुलली. तरी त्र्यंबक परिसरात बऱ्या पैकी
बहार पाहायला मिळाला होता. कर्नाटकात निलकुरींजी नामक झुडपाचा दर १२ वर्षांनी
फुलणारा बहर जसा डोंगर रांगांना जांभळ्या छटात रंगून देतो तसे दृश्य महाराष्ट्रात
पहायची मनीषा फार वर्षांपासून मनात उचंबळत होती. यंदा सप्टेंबर मधे खुटे घाट चढाई
दरम्यान करावीच उमदा बहर अनुभवला होता. mass flowering म्हणजे नेमक काय ह्याचा
थोडक्यात प्रत्यय ह्या ट्रेक दरम्यान आला. पाय वाटेच्या दुतर्फा 5 ते ८ फुट उंच
वाढलेली कारवीची झाडे जांभळ्या टपोऱ्या फुलांनी लगडली होती. पायाखाली गळून
पडलेल्या फुलांनी जणू जांभळा गालिचाच अंथरला होता. नजर जाईल तेथे जांभळे कोंदण.
कारवीच्या बहराचे सौदर्य शब्दात मांडता येणे कठीणच ते प्रत्यक्ष अनुभवायला हवे.
| डोंगर उतारावरील कारवीची जाळी |
ह्यानंतर
चांदोली अभय अरण्यातील सड्यांच्या सफरी दरम्यानही असेच कारवीचे बहर पाहायला
मिळाले. पण मनाला आस लागलेली ती संपूर्ण डोंगराला जांभळ्या रंगात रंगून देणारे बहर
पाहण्याची. पुढे कामाच्या गडबडीत जाणे झालेच नाही. याही वर्षी ही इच्छा अपूर्णच
राहतेकी काय असा प्रश्न मनाला भेडसावत असतानाच एका whats app group वर करमवीरभाई
यांनी share केलेले काही फोटो पहिले. धुक्याशी लपंडाव खेळणारा डोंगर संपूर्ण
जांभळ्या रंगात न्हाऊन निघालेला दिसत होता. हेच ते दृश्य, जे याची देही याची डोळा
पाहण्याची तीव्र इच्छा मनात बाळगून बसलेय मी गेले कित्येक वर्ष. पण नेमकं कधी
फुलावं कारवीने? गाठीशी महिनाभराच्या सुट्ट्या असूनही exam duty असल्यामुळे
सुट्टी घेणे शक्य नव्हते. म्हणजेच हा बहर पाहायला आणखी निदान आठवडाभर तरी वाट
पहावी लागणार होती. कारवीचा बहर तसा दोन तीन आठवडे टिकतो तरी उन वाढू लागले की
फुले करपून जातात आणि बहर ओसरू लागतो.
यंदा हा बहर फुलला होता ते बागलाणातल्या साल्हेर गडावर. एव्हाना सप्टेंबर संपून
ऑक्टोबर हिट सुरु झालेली. त्यात बागलाणातून पंधरवड्या पूर्वीच पावसाने काढता पाय
घेतलेला. दिवसागणिक बहर ओसरत जाणार ह्या चिंतेने मन खट्टू होत होते. देवा ह्या
वर्षी तरी मला हा बहर पाहण्याचे भाग्य लाभूदेत अशा विनवण्या करत कसा बसा आठवडा
ढकलला. शनिवारचा semister closing चा दिवस अखंड धावपळीत गेला. कामे आटोपता आटोपता
ऑफिस मधे बराच उशीर झालेला. घरी येऊन कसे बसे समान आवरले आणि एकदाचे नासिक कडे
गाडी पिटाळली. अख्खी रात्र प्रवास करून पहाटे साल्हेर वाडीत पोहोचलो. गेल्या आठवडाभर
कामासाठी झालेली धावपळ आणि रात्रीच्या प्रवासाचा शीण घालवण्यासाठी निदान २-३
तासाची शांत झोप आवश्यक होती. दोन तास झोप काढून आणि नाश्ता उरकून गड चढाईला
सुरुवात केली तेव्हा सकाळचे ९ वाजले होते. ऑक्टोबर महिना असल्याने डोक्यावर सूर्य
जणू आग ओकत होता. आठवड्याचे व्यस्त shedule, अपुरी झोप आणि त्यात हा उष्मा जीव
काढत होता. धुळ्याहून आलेला एक group कुत्रं मागे लागल्या गत दौडत कधीच पुढे निघून
गेला होता. आमच्या सोबत फोटोग्राफर मंडळी असल्यामुळे वळणा वळणावर केमेरे रोखले जात
होते त्यामुळे जवळ जवळ सरपटत म्हणता येईल इतक्या संथ गतीने आम्ही किल्ला चढत होतो.
एवढ्या उष्म्यात कारवीचा बहर शिल्लक असण्याच्या उरल्या सुरल्या आशा आता लोप पावू
लागल्या होत्या.
तासाभरात पहिला दरवाजा ओलांडून माचीवर दाखल झालो. नवरात्र उलटून गेल्यावर
सह्याद्रीत सगळीकडेच गवत उंचच उंच वाढू लागते. माचीवरही गवत चांगले कंबरभर उंच
वाढले होते. पुढे पायवाटेच्या दुतर्फा रानाचा ताबा कारवीने घेतला. गळून गेलेली
फुल, सुकलेल्या गळून पडलेल्या फुलांचा खच आणि हिरवीगार कारवी पाहून पुरता हिरमुस
झाला. उशीरच झाला यायला. राहून राहून वाटत होते की मागच्या आठवड्यात येथे येणे
व्हायला हवे होते. थोड्या दीडमूड अवस्थेतच पायऱ्या चढून पठारावर दाखल झालो.
पठारावर शेवटच्या दरवाज्या समोरच कारवीचा एक ताटवा टवटवीत फुलं लेऊन वाऱ्या संगे
खुशाल डोलत होता. त्याच्या दर्शनाने जीवात जीव आला. त्या फुलांना पाहून सहज विचार
आला लेकांनो निदान तुम्ही तरी वाट पहिलीत आमची. शतशः धन्यवाद. दरवाजाच्या कमानीवरील
टेहळणी बुरुजावर पोहोचून मागून येणाऱ्या राजस आणि सारंगना हाक मारली आणि मागे
वळले. आता पहिल्यांदाच गड माथ्याकडे नजर गेली होती. समोर जे दृश्य दिसत होते
त्यावर क्षणभर विश्वासच बसत नव्हता. हाच तो जांभळा पुष्पोत्सव. हीच ती रंगांची
उधळण जी पाहण्याची मनीषा मला इथवर घेऊन आली होती.
हिमालयातील valley of flowers चे फोटो आपण नेहेमीच पाहत असतो. सड्या वरील
रान फुलांचे रंगीत गालिचे पाहतो पण कारवीचा हा असा बहर हा एक आगळा अनुभव होता.
पठारापासून सुरु झालेला हा जांभळा सडा, संपूर्ण डोंगर उतार व्यापून परशुरामाचे
मंदिर असलेले शिखर चढून थेट परशुरामाच्या पादुकां पर्यंत पोहोचला होता. कोणीतरी
अखंड डोंगर उतराला जांभळ्या – हिरव्या रंगाच्या नाजूक नक्षीदार शालीत लापेटल्यासारखे भासत होते. हा संपूर्ण
नझारा निव्वळ शब्दातीत होता. आम्ही चौघेहीजण स्थंभित होऊन कितीतरी वेळ डोंगराकडे
नुसते पाहत उभे होतो.
![]() |
| P. C. : Sarang Naik |
मागे एकदा एका लेखासाठी कारवीच्या बहरातून जाणाऱ्या पायवाटेचे फोटो आहेत का
अशी विचारणा झाली होती. आज येथे असे शेकडो फोटो टिपता येणार होते. गुडघाभर उंची
गाठलेल्या टोपली कारवीने अंतरा अंतरावर दाट जाळी गुंफत संपूर्ण पठार, डोंगर उतार
आणि गड माथ्याचा ताबा घेतला होता. बऱ्यापैकी उंची गाठल्याने पाऊस नसला तरी येथे
धुके सांदळून अद्याप बराच ओलावा शिल्लक होता. माचीच्या तुलनेत येथिल बहर अजून
शाबूत असण्याचे बहुदा हेच कारण असावे. पायवाटेच्या दुतर्फा कारवीची गच्च जाळी
पसरली होती. दोन अडीजफुट सरळसोट वाढलेल्या कारवीच्या दांड्यांवर फुट फुट उंचीचा
चौफेर फुलोरा बहरला होता. झुडुपाच्या तळाशी गळून पडलेल्या फुलांचा खच पडला होता.
वाऱ्यासवे डोलणारा हा जांभळा रंग आपल्या जिवंत पणाची जणू ग्वाही देत होता. Social media वर ह्या
फुलोऱ्याचा अवाजवी गवगवा न झाल्याने गडावर सामसूम होती. अन्यथा आज गडावर जत्रा
भरली असती. धुळ्याहून आलेला group गड माथ्यावर पोहोचला होता. कारवीच्या जाळीतून
जेव्हा चालू लागलो तेव्हा फुलांवर घुटमळणाऱ्या असंख्य मधमाशांचा घु घु आवाज कानात
घुमू लागला.
आयताकृती टाक्याच्या वरच्या बाजूला फुललेल्या कारवीचे पाण्यावर हेलकावणारे
प्रतीबिंब पाहण्याचा आनंद काही औरच होता. यज्ञ वेदी ओलांडून आम्ही गुहेपाशी
पोहोचलो. गुहे शेजारी कारवीच्या जाळीत दडून बसलेल्या रात किड्यांच्या टोळक्यांची
एकमेकांशी जुगलबंदी सुरु होती. त्या निस्सीम शांततेत त्यांचा तो तालबद्द
किरकिराटही कानांना गोड भासत होता. गुहेपासून गड माथ्याकडे कूच केले. जस जसे वर
चढत होतो तस तसे कारवीच्या फुलांचा तजेला वाढत जात होता. फुलांवर सांदळलेले दव जणू
फुलांच्या तजेल्याचे रहस्य उलगडून सांगत होते. निसर्गाच्या रंगमंचावर कारवीच्या
बहराने मांडलेला हा पुष्पोत्सव इथे पार टिपेला पोहोचला होता. आणि या अद्भुत
सोहळ्याचे रसिक साक्षीदार आम्ही पार मंत्रमुग्ध होऊन ह्या जांभळ्या रंगोत्सवाचा भान
हरपून आस्वाद घेत होतो.
जांभळ्या जाळीतून नागमोडी वळणे घेत जाणारी पायवाट थेट गड शिखरावरील परशुराम
मंदिरा पर्यंत पसरली होती. टेकडीवरील जांभळ्या जाळीत लक्ष वेधून घेतले ते आपले
वेगळेपण मिरवत डौलात डोलणाऱ्या एकुलत्या एक पांढऱ्या कारवीच्या झुडूपाने.
सूर्यनारायणाच्या ढगांशी चालेल्या लपंडावामुळे “कभी धूप कभी छाव” अनुभवायला मिळत
होते. दुपारची न्याहारी आटोपून आम्ही अंग बधीर करणाऱ्या गार वाऱ्याचा कौल घेतला
आणि मंदिरा समोरच्या चौथऱ्यावर अंग झोकून दिले. तास दीड तास कसा असरला कळलेच नाही.
खडबडून जागे झालो ते शिखरावर पोहोचल्याच्या खुशीत गावातील एका पोराने फोडलेल्या
एका कर्कश किंकाळीने. हातातील चायना मोबाईलवर सैराट पिच्चरची गाणी बेन्जोलाही
लाजवील एव्हड्या मोठ्याने वाजवत थेट देव्हाऱ्यात घुसून देवाचे दर्शन घेऊन हे टोळके
आले तसे सैराट वेगात उतरून निघूनही गेले. आम्ही उठून सामान आवरले तेव्हड्यात
साटाण्याहून आलेले तीन गिर्यारोहक मंदिराशी पोहोचले. त्यांच्याशी चार गोष्टी बोलून
आम्ही उतरायला सुरुवात केली.
उन्हे कलायला लागल्यामुळे तिरपी पडणारी सूर्य किरणे कारवीच्या जांभळ्या
रंगला जणू सुवर्ण मुलामा देत होती. ह्या सोन पिवळ्या उन्हात कारवी अधिकच खुलून
दिसत होती. गडमाथा उतरून आम्ही गंगासागर तलावापाशी आलो. रेणुका आईचे दर्शन घेऊन आम्ही
तलावाच्या पलीकडे पोहोचलो. तलावाच्या स्थिर पाण्यावर डोंगराचे अखंड जांभळे
प्रतीबिंब तरंगत होते.
![]() |
| P. C : Sarang Naik |
इतर मंडळी मावळतीच्या उजेडात जमेल तितक्या रंग छटा
केमेऱ्यात टिपण्यात गढून गेलेली तर मी तेथेच तलावाच्या कट्ट्यावर बसून हा अनोखा
निसर्ग चमत्कार डोळ्यात साठवून घेण्याचा प्रयत्न करत होते. समोरच्या आडव्या
पसरलेल्या जांभळ्या जाळीत मला ओळखीचे स्मित हास्य उमटल्याचा उगाचच भास होत होता.
जणू हा सह्याद्री मला सांगत होता की हो मी तुझीच वाट पाहत होतो. आठवडाभर तू करत
असलेल्या विनवण्या माझ्या पर्यत पोहोचत होत्या. मन कृतज्ञतेने भरून आले आणि नकळत
डोळ्याच्या कडा पाणावल्या.
“And, when you want something, all the universe conspires in helping you to
achieve it.”
याची प्रचीती आज येत होती.
अखेर सूर्यराव क्षितिजा पलीकडे पसार झाले आणि अंधारू लागले तसे आम्ही गड
उतरू लागलो. पठारावरून गडाचा निरोप घेताना पाय अडखळत होते, मनोमन सह्याद्रीला
दंडवत घालून त्याचे शतशः आभार मानले. आजचा अनुभव जे काही समाधान देऊन गेला होता ते
शब्दात व्यक्त करता येत नव्हते. खूप वर्षापासून मनात घर करून बसलेली एक सुप्त
इच्छा आज पूर्ण झाली होती. किंबहुना अपेक्षे पेक्षा बरेच अधिक काही गवसले होते.
![]() |
| P.C. : Rajas Deshpande |
पुढच्या आठ वर्षात माझ्या आयुष्यात आणि येथील पर्यावरणात काय काय बदल घडतील
काही सांगता येणार नाही. त्यामुळे या वर्षी हे निसर्ग वैभव मनसोक्त अनुभवता आले
हीच या वर्षीची मिळकत म्हणायची. हा अनुभव आयुष्य भारासाठी पुरणार आहे ह्यात शंकाच
नाही. सह्याद्रीतील प्रत्येक सच्च्या भटक्याला आयुष्यात निदान एकदा तरी
सह्याद्रीचे हे असे गोंडस रुप अनुभवता यावे हीच सह्याद्री चरणी प्रार्थना !!




अप्रतिम.... अंगावर काटा आणि ओलावलेल्या पापण्या ....
ReplyDeleteखूप छान वर्णन केले आहे .
ReplyDeleteSundar sheili ani chayyachitra
ReplyDeletetoo good priti... too good photos
ReplyDeleteNice pictures and narration.
ReplyDeleteजबरदस्त... सुंदर लेख...
ReplyDeleteसुंदर...अप्रतिम फोटो !
ReplyDeleteअप्रतिम फोटो !
ReplyDeleteNice Article!....
ReplyDeleteछान. अप्रतिम आहे 🌸 🌻
ReplyDeleteअजूनही जावेसे वाटते.. पण संधी कधी मिळणार.. माहित नाही